दसऱ्याच्या मुहुर्तावर सुबोध भावेची वेबसाईट लाँच

0

मुंबई : अभिनेता सुबोध भावेने दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर त्याची वेबसाईट लाँच केली आहे. नाटक, चित्रपट, छोटा पडदा आणि जाहिरात या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारा हा अभिनेता सध्या यशाच्या शिखरावर आहे. एकापेक्षा एक सरस भूमिका आजवर सुबोध भावेने साकारल्या आहेत. तर बालगंधर्व, लोकमान्य, टिळक आणि आता डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वांचे बायोपिक देखील त्याने प्रेक्षकांसमोर आणले आहेत. आता आपल्या चाहत्यांसाठी सुबोधने वेबसाईटचा पर्याय दिला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांच्या आणखी जवळ जाण्याच्या प्रयत्नात आहे. याची माहिती सुबोध भावे याने त्याच्या इंस्टाग्रामवर दिली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह

सुबोध भावेचे या वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शीत झाले आहेत. तर येत्या काही महिन्यांमध्ये त्यांचा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ आणि ‘माझा अगडबम’ हा देखील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय छोट्या पडद्यावर त्यांची ‘तुला पाहते रे’ ही मालिकाही सुरु आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. विविध माध्यमातून सतत प्रेक्षकांच्या समोर येणाऱ्या या अभिनेत्याची सिनेक्षेत्रातील कारकिर्द वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. सुबोध भावेने आजवर केलेले चित्रपट, नाटक, मालिका, जाहिरात, डॉक्युमेंट्रीज यांची सविस्तर माहिती यावर मिळणार आहे. सुबोध नेहमीच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहिला आहे.