दहशतवादावर ‘कासो ऑपरेशन’ची मात्रा

0

नवी दिल्ली । काश्मीरमधील दहशतवादाला आळा घालण्यासाठी आक्रमक पावले उचलण्याचे संकेत भारतीय लष्कराने दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात प्रभावी ठरलेली ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे.

15 वर्षांपूर्वी लष्कराने ही कार्यप्रणाली  बंद केली होती. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि शोपियान येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल. स्थानिकांनी विरोधी केल्यामुळे लष्कराने 15 वर्षांपूर्वी कासो ऑपरेशन बंद केले होते. 2001 नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली. अशा अभियानावेळी येणार्‍या अडचणींमुळे सुरक्षा दल स्थानिक लोकांपासून दुरावले होते, असे सुरक्षा दलांना वाटते. पण, काश्मीरमधील युवा लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज यांची शोपियानंमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर लष्कराने कासो ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये 4000 सैनिकांच्या मदतीने एक मोठे अभियान चालवले होते. त्यावरून लष्कराच्या रणनीतीमधील बदलाचे संकेत मिळतात. भारतीय लष्कराच्या दोन सैनिकांचे शिर धडापासून वेगळे केल्यानंतर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून मागील तीन महिन्यांत 8 जण ठार तर 17 जण जखमी झाले आहेत. कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन असेही कासो ऑपरेशनला म्हटले जाते.