मुंबई । दहशतवादाविरूद्ध लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून सुरक्षादलांसाठी डोळे व कान बनून काम केल्यास देशाच्या सुरक्षेला कधीच धोका पोहचणार नाही असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॅाम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 26/11 हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आर.एस.एस. चे राष्ट्रीय सदस्य इंद्रेश कुमार, लेफटनंट जनरल विश्वंभर सिंह, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या रेश्मा जैन व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 26/11 हा देशाच्या हृदयावरील कधीही न मिटणारा व्रण आहे. ज्या प्रमाणे 9/11 मधील ट्विन टॅावरचा हल्ला हा आर्थिक महासत्तेवरचा हल्ला होता त्याचप्रमाणे मुंबईवरील हल्ला म्हणजे देशाच्या आर्थिक केंद्रस्थानावर हल्ला केला गेला होता. केवळ शहीदांना स्मरण करण्याचा हा दिवस नसून आजच्या दिवशी देशाच्या सुरक्षेसंबधी सतर्कता व तयारीचा आढावा घेण्याचा हा दिवस आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व शहीदांना श्रद्धाजंली वाहिली.
नक्षली कारवाईत 20 ते 22 टक्के कमी
देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षासंदर्भात उल्लेखनीय कार्य होत असून नक्षली कारवाईत 20 ते 22 टक्के कमी झाले आहे, असे केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सुरक्षेसंदर्भात फार चांगले काम केले आहे. समुद्रीमार्गाद्वारे होणार्या सुरक्षेत कडक पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे डीजीटल, सायबर सुरक्षासंर्दभातील चांगले काम केले आहे. सर्वोत्कृष्ट नवीन बनावटीची उपकरणं, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी लागणारा आवश्यक निधी केंद्रामार्फत कमी पडू दिला जात नाही.
या हल्ल्यात लक्षात आलेल्या सुरक्षेयंत्रणांमधील त्रुटी पूर्ण करण्यासाठी राज्य तसेच केंद्रशासनाने आश्वासक पाऊले उचलली आहेत. एन.एस.जी. च्या धर्तीवर राज्यात फोर्सवनची स्थापना करण्यात आली. अत्यंत सुसज्ज अशी उपकरणं आणि प्रशिक्षणाद्वारे हा फोर्सवन कार्यान्वित करण्यात आला आहे. समुद्री सीमेच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मच्छीमारांच्या बोटींना कलरकोडींग करण्यात आले आहे. त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. एखादी अनोळखी बोट आढळल्यास त्याबाबत तात्काळ कार्यवाही होऊन सुरक्षेसंदर्भांतील धोका दुर करण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्याठिकाणी मनुष्यबळाद्वारे सुरक्षा देता येणे शक्य नाही अशा परिसरातील नागरिेकांना वेळीच धोक्याचा इशारा देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांकडे सर्वात आधुनिक अशी कंट्रोल रुम आहे. फक्त एका वर्षाभरात संपूर्ण मुंबईत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात आले असून कंट्रोल रुमद्वारे संपूर्ण मुंबईवर एकाच वेळी सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. मुंबईतील अतीवृष्टीच्या काळात शहरातील वाहतूक नियंत्रित करणे व इतर बाबींवर काम करता आले. पोलिसांना केवळ बुलेट प्रुफच नव्हे तर बुलेट रेजिंस्टेंट जॅकेट्स देण्यात आले. या जॅकेटद्वारे शक्तीशाली शस्त्रातील बुलेट दहा मीटर अंतरावरुनही रोखता येते. गुप्तचर यंत्रणेवर अधिक काम करण्यात आले. यासाठी समन्वय समिती नेमून नियमित आढावा घेण्यात येतो. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक माध्यमांची मदत घेऊन समुपदेशन करुन आतंकवादी संघटनांमध्ये जाऊ शकणार्या युवकांना रोखण्यात यश आले आहे.
भारत कधीही न संपणारा देश, दहशतवादाला पाठिंबा देणारे संपतील
आजच्या दिवशी मुंबईवर अनेक ठिकाणी हल्ला झाला होता. त्यावेळी झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यातील घटनास्थळ असलेले हॉटेल ताज हे आजही मोठ्या पूर्वीच्याच दिमाखात उभे आहे. भारत हा कधीच संपणारा देश नसून दहशतवादाला पाठिंबा देणारेच संपतील, ही भावना हॉटेल ताजच्या निमित्ताने जगाला दाखवून देत आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता जवानांमुळे आपल्याकडे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सीमा सुरक्षा दलाच्या वतीने 26 नोव्हेंबरच्या शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित दिव्यांगांची कार रॅली, सायकल रॅलीचा समारोप मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर,सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अरुण कुमार, महानिरीक्षक रमेशचंद ध्यानी आदी उपस्थित होते.