दहशतवादाविरोधात भारत-जपान एकत्र

0

गांधीनगर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्यात गुरूवारी गुजरात येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर एकमत दर्शविले. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध केले. अल कायदा, आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा व त्यांच्याशी संबंधित संघटनांच्याविरूध्द भारत आणि जपान एकत्र येऊन काम करतील. पाकिस्तानने मुंबईतील 2008 चा तर 2016मध्ये पठाणकोटमधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी संयुक्त मागणीही शिंजो-मोदी यांनी संयुक्तपणे केली.

स्वच्छ ऊर्जेसाठी दोन्ही देशात करार
जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी मोदींशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले की, आमचे जपान-भारत गुंतवणूक सहकार्य रूपरेषेवर एकमत झाले आहे. भविष्यात मालाबार त्रिपक्षीय नौसैनिक सरावाप्रमाणे जपान, भारत, अमेरिका आपसातील संबंध अधिक मजबूत करतील. तर पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वच्छ ऊर्जेसाठी दोन्ही देशात करार झाला आहे. भारतात राहाणार्‍या जपानी नागरिकांनी भारतात अधिकाधिक रेस्टॉरंट सुरू करावेत, त्यासाठी भारत सरकार सहाकार्य करेल. दुपारी पावणेदोन वाजता दोन्ही देशांचे नेते द्विपक्षीय घोषणेसाठी माध्यमांच्या समोर आले. यावेळी मोदी म्हणाले, शिंजो यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कमी वेग आणि निकृष्ट सेवेच्या तक्रारींशी सामना करणार्‍या भारतीय रेल्वेसाठी हा मैलाचा दगड आहे. बुलेट ट्रेनमुळे भारताला रेल्वेच्या गतीचे तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. ज्याचा फायदा अन्य रेल्वे गाड्यांनाही होणार आहे. आपल्या मनोगतात शिंजो अ‍ॅबे म्हणाले, भारत-जपान यांचे नाते म्हणजे हिंद आणि प्रशांत महासागरासारखे आहे. हे दोन्ही देश आशियाखंडातील सर्वात मोठे देश आहेत. पुढच्यावेळी मी जेव्हा अहमदाबादेत येईन तेव्हा मोदी यांच्यासह बुलेट ट्रेनमधून प्रवास करेन. बुलेट ट्रेन प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करू.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन
साबरमती स्टेडियम येथे शिंजो अ‍ॅबे आणि नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन आपल्याला मोफत मिळत आहे. कुणीही देणार नाही इतक्या कमी व्याजाने जपानने भारताला कर्ज दिले आहे. या प्रकल्पासाठी 88 हजार कोटींचे कर्ज केवळ 0.1 टक्के व्याजदराने जपानने दिले आहे. जपानसारखा मित्र मिळाला तर कुठल्याही प्रकल्पाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. असा कुठला मित्र मिळू शकतो का, जो मोफत कर्ज देऊ शकतो. जपानचे हे कर्ज 50 वर्षांत फेडायचे आहे; शिवाय पंधरा वर्षांनंतर कर्ज फेडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.