दहशतवादी अबु इस्माईल ठार

0

श्रीनगर : अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबु इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. श्रीनगरमधील नौगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत इस्माईल मारला गेला. पाकिस्तानी असलेला अबु हा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर 19 जण जखमी झाले होते.

सुरक्षा दलाच्या विशेष मोहिमेला यश
या वर्षी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते. अबु इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या सांकेतिक भाषेतील संभाषणाच्या आधारे अबुचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या इस्माईलच्या शोधासाठी सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली होती. दक्षिण काश्मीरमध्ये त्यासाठी विशेष शोध मोहिम राबवण्यात आली होती.

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर
काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवायांमध्ये लष्करचे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. त्यात कमांडर बाशीर लष्करी, संघटनेचा काश्मीरमधील टॉप कमांडर अबू दुजानाचाही समावेश आहे. दुजाना मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची सूत्रे अबु इस्माईलकडे सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले होते.