मुंबई । मुंबईतील रेल्वेस्थानकांमध्ये ठिकाठिकाणी फिरत असलेले भिकारी कदाचित प्रशिक्षित दहशतवादी असू शकतात, जे अचानक मुंबईतील कोणत्याही उपनगरीय रेल्वे स्थानक अथवा लोकलला लक्ष्य करू शकतात, असा धक्कादायक अहवाल गुप्तचर खात्याने दिला आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तातडीने ऑडीट करण्याचा निर्णय संबंधित सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. याकरता विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामध्ये रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा पथक यांचा सामावेश आहे. ते प्रत्येक रेल्वे स्थानकाचे सुरक्षाच्या दृष्टीकोनातून ऑडीट सुरू करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची सुरक्षा अजूनही वार्यावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर 26/11 च्या वेळीही दशहतवादी हल्ला झाला होता. या रेल्वे स्थानकावर अजून 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. ज्यामाध्यमातून संपूर्ण रेल्वे स्थानक अधिक सुरक्षित होऊ शकते. या ऑडिट रिपोर्टमध्ये काही ठिकाणाकडील सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आढळूण आले. तर काही कॅमेरे योग्य दिशेने, योग्य ठिकाणी बसवण्यात आले नव्हते.
बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये बेकायदा प्रवेशद्वारे
मुंबईच्या उपनगरीय लोकल गाड्यांमधून प्रत्येक दिवसाला 6 लाख प्रवासी प्रवास करत असतात, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा प्राधान्यक्रमावर आहे. त्यासाठी शक्य तितक्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. रेल्वे पोलिसांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या एकूण 10 उपनगरीय रेल्वे स्थानकांचे ऑडिट सुरू आहे. त्यात रेल्वे पोलिसांनी अनेक रेल्वे स्थानकांमध्ये बेकायदा प्रवेशद्वारे सुरू असल्याचे दिसून आले आहे. ते सर्व प्रवेशद्वारे तातडीने बंद करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे.
तातडीची उपाययोजना करणार
अतिरिक्त पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने केलेला ऑडिट रिपोर्ट रेल्वे मंत्रालय आणि गृहविभाग यांना सादर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 उपनगरिय रेल्वे स्थानकांचे ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर तातडीने निदर्शनास आलेल्या त्रृटींवर उपाययोजना केली जाणार आहे. या पथकाने मागील आठवड्यात मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसचे ऑडिट केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रृटी आढळूण आल्या.