श्रीनगर : सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा भाचा तलहा रशिदला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले. रशिद हा जैशचा काश्मीरमधील कमांडर होता. पुलवामा जिल्ह्यातील अलगार कंडी पट्ट्यामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला.
जैशला मोठा हादरा
चकमकीत ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, जैशचा कमांडर तलहा रशिद, मोहम्मद भाई आणि वसीम अशी त्यांची नावे आहे. मोहम्मद भाई हादेखील जैशचा कमांडर असून तो पाकिस्तानचा असल्याचे समजते. तर वसीम हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मसूदच्या भाच्याचा खात्मा झाल्याने जैशला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जाते. या तिघांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांकडे अमेरिकन शस्त्र
सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दहशतवाद्यांकडील अमेरिकन बनावटीची रायफलही जप्त केली आहे. ही रायफल पाकिस्तानी सैन्य वापरते. त्यामुळे हे दहशतवादी पाकिस्तानातून आल्याची शक्यता आहे. दहशतवादी कुठून आले याच्याशी देणे-घेणे नाही. दहशतवादाचा बिमोड करणे हे आमचे लक्ष्य आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले. दहशतवाद्यांकडून एके 46, पिस्तूल आणि एम 4 रायफल जप्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या रायफलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काश्मीरमधील दहशतवादी समीर उर्फ टायगरजवळ अमेरिकन बनावटीची ही रायफल दिसली होती. अफगाणिस्तानात नाटोचे सैन्य या रायफली वापरतात. त्या दहशतवाद्यांकडे कुठून आल्या, याचा तपास करणार आहोत, असे लष्कराने सांगितले.