नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडविल्याने आठ जवान शहीद झालेत. या जवानांत सातारा जिल्ह्यातील मोहाट तालुक्याच्या जावळी येथील रवींद्र बबन धनावडे (वय 38) या जवानाचाही समावेश आहे. सैन्यदलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलिस ठाण्यात दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली. सकाळी हा हल्ला झाला. शहीद झालेल्या जवानांत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चार तर अन्य जवान लष्कराचे होते. सीआरपीएफ व लष्कराने या वसाहतीला वेढा घालून घुसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यास सुरुवात केली असता, जोरदार धुमश्चक्री उडाली. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांची ही वसाहत असून, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. दुसरीकडे, सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानच्या रेंजर्सला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले आहेत.
पोलिस कुटुंबीय सुखरूप
हे देखील वाचा
दहशतवादी पोलिस वसाहतीत घुसल्याने जवानांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर गृहमंत्रालयाच्यावतीने मीडियाला माहिती देण्यात येऊन, लष्कर व सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना घेरले असून, सर्व कुटुंबीय सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. नेमके किती दहशतवादी घुसलेले आहेत, याची माहिती मात्र देण्यात आली नाही. या घटनेनंतर तातडीने वरिष्ठस्तरीय बैठकही बोलाविण्यात आली होती. तिला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षि आणि अन्य अधिकारी सहभागी झाले होते. लेप्टनंट जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले, की सर्व कुटुंबीयांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेले आहे. तसेच, घुसलेल्या दहशतवाद्यांना एण्काउंटर हाती घेण्यात आलेले होते.
दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या
दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळू लागलेत असा दावा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, दहशतवादी कारवाया काश्मीर खोर्यात आणखी वाढल्या असल्याचे वास्तव आहे. 2016 मध्ये पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या 123 घटना घडल्या होत्या. तर यावर्षी जुलैमध्येच हे प्रमाण 78 पर्यंत पोहोचले आहे. तसेच या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 71 तरुण दहशतवादी संघटनेत भरती झाल्याचे गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी सांगतात. चालू वर्षात 132 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला असून, यातील 74 दहशतवादी हे पाकिस्तानचे होते. तर 58 दहशतवादी हे स्थानिक होते असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांच्या 14 कमांडर्सचा समावेश होता.