नवी दिल्ली । पंजाबचे माजी पोलीस संचालक आणि सुपरकॉप अशी प्रतिमा असलेल्या केपीएस गिल यांचे शुक्रवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून गिल आजारी होते. गिल यांना 18 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मते त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. अचानकपणे आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गिल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
केपीएस गिल यांचे पूर्ण नाव कंवर पाल गिल होते. त्यांचा जन्म 1934 मध्ये पंजाबमधील लुधियाना शहरात झाला होता. गिल यांना दोन वेळा पंजाबचे पोलीस महासंचालक बनवण्यात आले. 80- 90 च्या दशकात सुरवातीला पंजाब आणि नंतर देशात फैलावलेल्या खलिस्तानी दहशतवादाचा खात्मा करण्याचे सारे श्रेय गिल यांना दिले जाते. गिल यांनी 1958 मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. पंजाबमध्ये खलिस्तान दहशतवादाने थैमान घातलेले असताना गिल यांची पहिल्यांदा मे 1988 ते 1990 आणि नंतर नोव्हेंबर 1991 ते डिसेंबर 1995 पर्यत पंजाबच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. श्रीलंकेतील लिट्टे चळवळीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तेथील सरकारने गिल यांचा सल्ला घेतला होता. गुरातमध्ये 2002 मध्ये गुरातमध्ये झालेल्या सांप्रदायिक दंग्यानंतर, त्याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात गिल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी गिल हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा सल्लागार होते.
अफगाणिस्तानातही काम
केपीएस गिल यांनी अफगाणिस्तानातही काम केले होते. त्याठिकाणी युद्धसदृश्य परिस्थिती असताना गिल यांनी 218 किलोमीटर अंतराचा देलाराम-जरंज महामार्ग चार वर्षांमध्ये बांधला होता. त्यांच्या निधनामुळे अफगाणिस्तानच्या सरकारनेही शोक व्यक्त केला.
ऑपरेशन ब्लॅकथंडर
माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई केल्यानंतर 1988 मध्ये खलिस्तान दहशतवादी पुन्हा अमृतसरमधील सुवर्णमंदिरात एकत्र आले होते. त्यावेळी ऑपरेशन ब्लॅकथंडरद्वारे कारवाई करत गिल यांनी फारसा गोळीबार न करता या दहशतवाद्यांना सुवर्णमंदिराच्या बाहेर काढले होते. गिल यांनी ही कारवाई करताना सुवर्णमंदिराचे पाणी आणि वीजपुरवठा बंद केला होता. दहशतवाद्यांच्या विरोधातील या कारवाईला मोठे यश मिळाल्यानंतर गिल यांनी दहशतवाद रोखण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली होती. त्यामुळे दहशतवाद्यांमध्ये गिल यांच्या नावाची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी त्यांना सुपरकॉप ही बिरुदावली दिली होती.
पद्मश्री किताबाने सन्मानीत
केपीएस गिल यांना 1989 मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरवण्यात आले. गिल यांनी पंजाब : द नाईटस ऑफ फॉल्सवुड इन 1997 नावाचे पुस्तकही लिहिले होते. याशिवाय 2001 मध्ये आंतकवादावर लिहिलेल्या एका पुस्तकाचे संपादन केले होते. गिल काउंटर टेरेरिझमचे सल्लागार, वक्ते आणि संपादक ही होते. याशिवाय त्यांनी वादातीत इंडियन हॉकी फेडरेशन (आयएचएफ) आणि इंस्टिट्यूट फॉर कन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे (आयसीएम) अध्यक्षपद भूषवले होते.