रोम: इजिप्तमध्ये एका माजी फुटबॉलपटूला दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे एक नाव वाद उद्भवला आहे. मोहम्मद अबूत्रिका असे या फुटबॉलपटूचे नाव आहे. त्याने चार वेळेस वर्षातील सर्वोत्कृष्ट आफ्रिकन फुटबॉलपटूचा खिताब मिळवलेला आहे. सध्या त्याचे वय 38 वर्षे असून इजिप्तमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याचे नाव घेतले जाते. परंतु त्याचे मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर होता. देशातील ही सर्वात मोठी संघटना असून सरकारने तिच्यावर बंदी घातली आहे. या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून हजारो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्याचे नाव दहशतवाद्यांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय न्यायालयाने बुधवारी दिला. या यादीत सध्या 1,500 नावे समाविष्ट आहेत. यात माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचाही समावेश आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मोर्सी यांना अबूत्रिका याने पाठिंबा दिला होता. मुस्लिम ब्रदरहूडला निधी पुरवठा केल्याचाही त्याच्यावर आरोप होता, मात्र त्याने हा आरोप फेटाळून लावला.