श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. कुपवाड्यातील पंजगाम येथील लष्करी तळाला दहशतवाद्यांनी टार्गेट केले. या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले असून यात एक कॅप्टन, एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उशीरापर्यंत चकमक सुरू होती. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजगाम हे श्रीनगरपासून 87 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाकव्याप्त काश्मीर राजधानीपासून 74 किलोमीटर अंतरावर आहे.
पहाटे 4 वाजता हल्ला
कुपवाड्यामधील पंजगाम येथील लष्कराच्या तळावर गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून दोन दहशतवादी कॅम्पमध्ये लपून होते. जवानांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली होती. उशीरापर्यंत शोधमोहिम सुरू होती.
दगडफेकीमुळे पुन्हा तणाव
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फुटीरतावाद्यांकडून पुन्हा एकदा दगडफेकीचा प्रकार समोर आला आहे. यामुळे भारतीय लष्कराच्या शोधमोहिमेतही अडथळा येत होता. कुपवाड्यातील हल्ल्यानंतर दोन अतिरेक्यांनाही ठार करण्यात आल्याचे वृत्त समजताच क्रेलपोरापासून सहा किलोमीटर अंतरावर काही आंदोलनकर्त्यांनी पसगाम येथे एका शिबीरावर हल्ला केला. येथील रस्त्यावर मोठ्या संख्येने तरूण उतरले होते व भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात येत होती. दगडफेकही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने जमावावर अश्रुधूर सोडण्यात आला.
खोर्यातील तणाव आणखी वाढला
श्रीनगरमध्ये 9 एप्रिलला झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काश्मीर खोर्यात तणाव वाढला आहे. 24 एप्रिलला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पीडीपीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांचा मृत्यू झाला होता. 17 एप्रिलला दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सशी संबंधित एका वकीलाची शोपिया जिल्ह्यात हत्या केली होती. 26 मार्चला कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. 23 फेब्रुवारीला शोपियामध्ये आर्मीच्या पेट्रोलिंग पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 3 जवान शहीद झाले होते. फेब्रुवारीमध्ये हंदवाडा येथे झालेल्या एन्काउंटरमध्ये एक मेजर सतीश दहिया आणि 3 जवान शहीद झाले होते.