नवी दिल्ली । दहशतवाद्यांना मदत करणार्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून घुसखोरांना मदत केली जात असल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यासोबतच पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाणही वाढले होते. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत नौशेरा सेक्टरमधील पाक लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती भारतीय सैन्याचे मेजर अशोक नरुला यांनी दिली.
वितळणार्या बर्फामुळे घुसखोरीचे मार्ग खुले
खोर्यातला बर्फ वितळत असल्यामुळे या काळात घुसखोरीचे प्रकार दरवर्षी वाढतात. या घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैनिक कव्हरिंग फायर देतात. अशाच एका गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. बर्फ वितळत असल्याने आणि मार्ग खुले झाले आहेत पण घुसखोरांना रोखण्यासाठी सैन्य सज्ज असल्याचे नरुला यांनी सांगितले. नरुला यांनी भारतीय सैन्याच्या कारवाईचा व्हिडीओ जारी केला आहे. 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणार्या चौक्या लष्कराने तोफगोळयाच्या वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्या.
हे सर्जीकल स्ट्राईक नव्हे
दहशतवाद विरोधी रणनितीतंर्गत ही कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरीला मदत करणार्या पोस्टसवर वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई केली जाते अशी माहिती मेजर नरुला यांनी दिली. घुसखोरीला मदत केली तर अशाच प्रकारची कारवाई यापुढेही केली जाईल, असा संदेश लष्कराने दिला आहे. भारताची ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाही. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा भारतीय लष्कराच्या विशेष कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यावेळी भारतीय सैन्याने आपल्याच हद्दीतच राहून जोरदार गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त झाले.
10 ते 15 पाकिस्तानी सैनिक ठार
भारतीय लष्कराची सर्जिकल स्ट्राईकनंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. गोळीला गोळीने उत्तर देण्याचे आपले धोरण बाजूला ठेवत भारतीय लष्कराने गोळीला तोफगोळयाच्या वर्षावाने उत्तर दिले. घुसखोरीला मदत करणार्या पाकिस्तानी सैन्यावर जरब बसवण्यासाठी लष्कराने घातक हत्याराचा उपयोग केला. एकापाठोपाठ एक स्फोट घडवून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर नष्ट केले. भारताने केलेल्या या हल्ल्यात 10 ते 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा अंदाज सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 20 आणि 21 मे रोजी केलेल्या या कारवाईची माहिती लष्कराने पत्रकारपरिषद घेऊन दिली.