नवी दिल्ली : दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके असून यांचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यासोबतच जगातील सर्व देशांनी काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे मतही मोदी यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. तसेच यावेळी जागतिक मुद्यांवर चर्चा केली.
ब्यूनस आयर्स येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेच्या अनौपचारिक बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दहशतवाद आणि आर्थिक गुन्ह्याविरोधात एकजूट होण्याची गरज असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, दहशतवाद आणि कट्टरवाद जगासमोरील एक मोठा धोका आहे. त्याचबरोबर आर्थिक गुन्हा करणाऱ्यांचाही धोका आहे. असेही मोदी यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदीं यांनी जगातील सर्व विकसनशील देशांना एकजुट होण्याचे आवाहन केले.