दहशतीचा नवा अवतार उघड!

0

मुंबई : मध्यंतरी लागोपाठ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये स्फोट व अपघात झाल्यावर झालेल्या तपासणीत अनेक संशयास्पद मुद्दे समोर आले आहेत. त्यामुळेच मुंबई व महाराष्ट्रात रेल्वेच्या परिसरात अधिक जागरूक पहारा ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचवेळी प्रवाशांनाही सावध करण्याची पावले उचलण्यात आली आहेत. लखनऊ येथे चकमकीत मारला गेलेल्या जिहादीच्या घरात मिळालेल्या माहितीमुळे तपास यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात अखंड वर्दळ असते आणि त्यात वावरणारे फेरीवाले व भिकारी चटकन नजरेत न भरणारी बाब आहे.

भिकारी फेरीवाल्यांपासून सावध रहावे लागणार!
अलीकडे तोयबा व इसिसने भारतीय रेल्वेत एखाद्या शिलेदारांना पाठवून घातपात करण्याचे तंत्र अवलंबले होते. त्यापैकीच एकाला मध्यप्रदेशात स्फोट घडवून पळालेला असताना लखनऊ येथील एका घरात घेरलेला होता. तशा काही शंकास्पद घटना मुंबईतही झाल्या आहेत. उपनगरात अनेक भागात लोहमार्गावर मोठे दगड ठेवलेले आढळले. त्याचा खूप तपास करूनही काही रहस्ये उलगडलेली नाहीत. म्हणूनच पोलिसांना हा प्रकार शंकास्पद वाटलेला आहे. पूर्वी कधी मुंबई परिसरात असे प्रकार घडलेले नाहीत. फेरीवाले व भिकारी कितीही गर्दीत लोकल गाड्यांमधून फिरत असतात आणि त्यांना कोणी हटकत नाही. त्याचाच फायदा घेऊन असे वेशांतर केलेला दहशतवादी मोठा उत्पात घडवू शकतो. म्हणून रेल्वे पोलिसांनी आपल्या लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यातून आढळणार्‍या भिकारी व फेरीवाल्यांचा कडेकोट बंदोबस्त करण्यास महाराष्ट्र पोलिसांनी सुचवले आहे.