चाळीसगाव । भारतीय चलनातील दहा रुपयाची नाणी सरकारने जनतेच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले आहेत. मात्र हे दहा रुपयाचे नाणे गैरसमजाच्या वादाच्या भोवर्यात सापडले असून शहरातील जवळपास सर्व दुकानदार ही नाणी घेण्यास नकार देत आहेत. नॅशनालिस्ट कंझुमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचे तालुका सचिव विकास वाणी यांच्याकडून स्टेट बँकेच्या कृषी शाखेने चक्क ही नाणी नाकारल्याने त्यांनी शाखेचे व्यवस्थापक, मुंबई शाखेकडे तक्रार केली व लेखी स्वरुपात खुलासा देण्याची मागणी केली. तहसीलदार, जागो जागो ग्राहक संस्था व नॅशनालिस्ट कंझुमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.
ग्राहकाकडून घेण्यास नकार
नाणे बंद झाल्याच्या अफवा पसरल्या असून चलनातील मुख्य नाणे असून देखील दुकानदार व ग्राहक नाणे घेण्यास तयार नाही. त्यामुळे हे नाणे वादाच्या भोवर्यात सापडले आहे. सर्वसामान्य माणसाकडे ही नाणी येत असतात. दुकानदार मात्र त्यांच्याकडे असलेली नाणे ग्राहकाला देतो पण ग्राहकाकडून घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता ग्राहक देखील हे नाणे घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
खुलासा मागितला
विकास वाणी हे बँकेत 3 हजार 500 रुपये भरण्यासाठी गेले असता त्यांचे जवळ दहा रुपयाची दहा नाणी म्हणजेच शंभर रुपये होते. भरणा करण्याच्या ठिकाणी असलेल्या एका अधिकार्याने दहा नाणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी लागलीच व्यवस्थापकांची भेट घेतली असता त्यांनी देखील नाणी घेण्यास नकार दिला. वाणी यांनी याबाबत आपण मला का नकार दिला, कोणत्या नियमानुसार आपण नाणी घेत नाहीत त्याचा जीआर मला द्यावा व लेखी खुलासा मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
10 रुपयांची नाणी दोन हजार रुपयाची घेऊन एलआयसी ऑफीसमध्ये गेलो असता, येथे चिल्लर स्विकारली जाणार नाही अशी नोटीस लावलेली होती. वरिष्ठांना विचारणा केली असता आम्हाला वरिष्ठांनी आदेश असल्याचे सांगितले. बँक नाणी घेत नसेल तर आम्ही या नाणींचे करायचे काय?
– अशोक अमृतकार, व्यापारी पातोंडा
तक्रारदार बँकेत आले होते, त्यांनी 10 रुपयाच्या दहा नाण्यासंदर्भात सांगितले असता त्यांना मी दहा नाणी द्या व शंकर रुपये घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र त्यांनी घेतले नाही.
– सुरेश राव-बँक व्यवस्थापक