दहावीचा निकाल लांबणीवर

0

मुंबई । दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो आणखी काही दिवस उशीरा लागण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनच्या सुरुवातीलाच हा निकाल लागणे अपेक्षित असताना तो अद्याप न लागल्याने विद्यार्थ्यांकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला 2017 या वर्षासाठी राज्यभरातून 17.66 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी वाट पहावी लागणार आहे.

शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल 9 जूननंतरच लागणार आहे. नेहमीपेक्षा या निकालाला 8 दिवसांहून अधिक उशीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 30 मे रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. 9 जून रोजी 12 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळणार आहेत. त्याचप्रमाणे 10 वीच्या निकालाची तारीख निश्‍चित झाल्यावर विद्यार्थ्यांना तो ऑनलाईन पाहता येईल.

यावर्षी 10 वीची बोर्डाची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2017 या कालावधीत घेण्यात आली होती. यावेळी 17,66,098 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील 16,89,239 विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच परीक्षा दिली, तर बाकीचे दुसर्‍यांदा परीक्षेला बसले होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी 9,89,908 विद्यार्थिनी होत्या तर 7,76,190 विद्यार्थी होते. राज्यभरातून 4,728 इतक्या सेंटरवर ही परीक्षा घेण्यात आली.

मागील वर्षी 10 वीच्या परीक्षेचा निकाल 6 जून रोजी लागला होता. मात्र यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी जूनच्या दुसर्‍या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर साधारण आठवड्याभरानी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या शाळेकडून मिळणार आहे. ही प्रक्रिया लांबल्याने 11 वीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला उशीर होण्याचीही शक्यता आहे. निकाल लागण्यास वेळ लागत असताना हा उशीर का होत आहे याबाबत शिक्षण मंडळाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.