दहावीचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

0

शिरसोली प्र.न. येथील घटना; आईवडील शेतात मजुरीसाठी गेले असतांना घेतला गळफास

जळगाव: गणित पेपर कठीण गेल्याने आता पास होणार नाही, या तणावात शिरसोली प्र.न.येथील गायत्री तुकाराम अस्वार (वय 16) या विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई वडील मजूरीसाठी शेतात गेले असतांना गायत्रीने हे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली.

शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात गायत्री दहावीला होती. गुरुवारी तिचा गणिताचा पेपर होता. गावातील केंद्रात पेपर देवून ती घरी परतली. अभ्यास करुनही गणिताचा पेपर कठीण गेला. आईवडील मोल मजुरी करुन आपल्याला शिकवितात. आणि आपण गणिताच्या पेपर कठीण गेल्याने नापास होणार हे शल्य गायत्री हिला बोचत होते. आईला गायत्रीने गणिताचा पेपर कठीण गेल्याबाबत गुरुवारी रात्री सांगितले. आईनेही तिची पेपर पास होवून तुला कुठे, नोकरी करायची आहे, असे म्हणत गायत्रीची समजूत काढली. मात्र गायत्रीच्या मनात नापास होण्याची भिती कायम होती.

पोळपाट घेण्यासाठी घरी आली अन् गळफास

शुक्रवारी सकाळी गायत्रीचे आईवडील नेहमीप्रमाणे मजुरीसाठी निघून गेले. यानंतर घराजवळ राहत असलेल्या काकांकडे पापड लाटण्यासाठी गायत्री गेली होती. तुमच्या घरुन पापड लाटण्यासाठी पोळपाट लाटणे घेवून ये असे काकू सुरेखा हिने गायत्रीला सांगितले. त्यानुसार गायत्री घरी आली. बराच वेळ होवून ती पुन्हा परत येत नसल्याने काकू गेली असता, तिला गायत्री गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. यानंतर गायत्रीचे काका निवृत्ती अस्वार यांनी पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना प्रकार कळविला. माहिती मिळाल्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गणेश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. गायत्रीच्या पश्‍चात तुकाराम अस्वार (बारी) हे आई मंगलाबाई, लहान बहिण शारदा, भाऊ जयेश असा परिवार आहे. घटनेने शिरसोली येथे हळहळ व्यक्त
होत आहे.