दहावीची परीक्षा रद्द, सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण

0

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दहावी बोर्डाची परीक्षा पूर्णपणे रद्द केली आहे. त्याशिवाय अकरावीच्या परीक्षादेखील घेतल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तमिळनाडू सरकारने 15 जून रोजी घेण्यात येणारी दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जवळपास 9 लाख विद्यार्थी बसणार होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सहामाही परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना 80 टक्के गुण देण्यात येणार आहेत. उर्वरित 20 टक्के गुण देण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लक्षात घेतली जाणार आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या काही पेपर्सच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, त्याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. चेन्नई आणि इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर 15 जून रोजी होणारी दहावीची परीक्षा रद्द केली असून, विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश दिला असल्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले.