दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचे रँगिंग : जवाहर नवोदय विद्यालयातील धक्कादायक घटना

प्राचार्यांनी दडपले प्रकरण : पालकांच्या तक्रारीनंतर दोन विद्यार्थ्यांचे निलंबन : दोषी प्राचार्य शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईची मागणी

raging of two students of class 10 in Jawahar Navodaya Vidyalaya in Bhusawal  भुसावळ : शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीच्या वर्गातील मुलांना बारावीच्या वर्गातील मुलांनी रॅगिंग करीत मारहाण करण्याची गंभीर घटना मंगळवार, 4 ऑक्टोंबर रात्री 10.30 वाजता घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाकडे नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी तातडीने कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा सल्ला पीडीत विद्यार्थ्यांच्या पालकांना दिल्याने आधी त्यांना बडतर्फ करावे तसेच हे प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या दोषी प्राचार्य व शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. पीडीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात भुसावळ पोलिस उपअधीक्षकांकडे तक्रार करीत प्राचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तीन तास केली विद्यार्थ्यांना मारहाण
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, मंगळवारी जवाहर नवोदय विद्यालयात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बारावीच्या वर्गातील मुलांनी दहावीच्या वर्गातील मुलांची रॅगिंग करण्यास सुरवात केली. रॅगिंगमध्ये सुमारे सहा विद्यार्थ्यांना बारावीच्या वर्गातील मुलांनी जबर मारहाण केली. ही मारहाण तब्बल तीन तास म्हणजे रात्री 1.30 वाजेपर्यत सुरू होती. तक्रारकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, माझ्या मुलास खाली झोपवून त्यास अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या तोंडावर चप्पलेने मारहाण केली. पाठीवर सुध्दा जबर मारले आहे. रात्रीच्या वेळी विद्यालयाचे गेट बंद असल्याने रात्री हा प्रकार बाहेर येऊ शकला नाही.

प्राचार्यांनी दडपले प्रकरण
शाळेच्या मैदानावर दुसर्‍या दिवशी बुधवार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी जमले असता यावेळी प्राचार्य खंडारे यांना विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगितला. यावेळी प्राचार्य यांनी याप्रकरणी मुलास झोपेतून उठवून त्याच्या पाठीचा फोटो काढला मात्र, मारणार्‍या दोन्हींवर कारवाई केली नाही. उलट या प्रकरणाची बाहेर वाच्यता करू नका, नाही तर शाळेचे नाव खराब होईल, तुमचे नुकसान होईल, असे मुलांना सांगण्यात आले. यामुळे झालेल्या प्रकाराची माहिती जखमी असलेल्या मुलांच्या पालकांना सुध्दा सांगण्यात आली नाही, प्रकरण दाबण्याचा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी रविवारी प्राचार्य यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रविवार असल्याने सुटी असल्याने सोमवारी भेट घेता येईल, असे सांगितल्याने प्राचार्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

पाच दिवसानंतर घटनेचा प्रकार उघडकीस
बारावीतील ज्या मुलांनी मारहाण केली होती, त्या मुलांच्या पालकांनी दहावीतील ज्या मुलास अधिक मार लागला आहे, त्याच्या पालकांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती देत माफि मागितली. आमच्या मुलांकडून चुक झाली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे जखमी मुलाचे पालकांनी तत्काळ भुसावळ विद्यालय गाठले. मुलाची भेट घेतली. प्राचार्यांशी चर्चा केली. मात्र असा प्रकारच घडला नाही, असे प्राचार्यांनी सांगितले. घटनेच्या पाच दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला. तोपर्यत मुलांवर उपचारही करण्यात आले नसल्याचे पोलिसांना पीडीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.

सात दिवसात अहवाल द्या अन्यथा गुन्हा दाखल होणार
भुसावळ सारख्या लहानश्या गावात रॅगिंगची घटना घडल्याने या गंभीर प्रकरणाची दखल डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी घेतली आहे. जखमी मुलाच्या पालकांची तक्रार अर्ज दिल्यानंतर प्रकरणी प्राचार्य एस.एस.खंडारे यांना त्यांनी लेखी पत्र देत अवघ्या सात दिवसात या प्रकरणाचा लेखी अहवाल पाठवावा, जर अहवाल प्राप्त झाला नाही तर या प्रकरणात तुम्हालाही संशयीत आरोपी केले जाईल, असेही पोलिस उपअधीक्षकांनी बजावले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट
रविवारी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दुपारी दोन वाजता जवाहर नवोदय विद्यालयास भेट दिली मात्र प्राचार्य यांची भेट होऊ शकली नाही. मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे, सोमवारी पुन्हा या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विद्यालयात भेट देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.