दहावीच्या निकालामध्ये कोकण अव्वल!

0

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. पुण्याचा निकाल 91.95 लागला तर संपुर्ण राज्याचा 88.74 टक्के निकाल लागला. राज्यात यावर्षी देखील मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून, 91.46 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहे. तर 88.74 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.

3676 शाळांचा निकाल 100 टक्के
राज्यातील 21684 शाळांमधून 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 3676 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 32 टक्के शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा सर्वाधिक 96.18 टक्के निकाल तर सर्वात कमी नागपुर विभागाचा 83.67 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना 24 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. गुणपत्रिकेसोबत कलचाचणीच्या निकालाची प्रत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

यावर्षी निकालात घट
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात 0.82 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र यंदा कला व क्रीडा गुणांच्या सवलतीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. 100 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 193 इतकी आहे. तर 153 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 85.72 टक्के लागला आहे.

कटऑफ वाढणार
90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 48 हजार 470 इतकी आहे. विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांचे कट ऑफ वाढणार आहेत. एकूण 3 लाख 49 हजार 485 विद्यार्थी प्राविण्यासह विशेष श्रेणीत, 5 लाख 44 हजार 576 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 4 लाख 53 हजार 599 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि 1 लाख 11 हजार 195 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

फेरपरीक्षा 18 जूलैपासून
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची 18 जूलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये याकरिता दहावी व बारावीची फेरपरीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी 19 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निकाल वेळेतच
महापालिका निवडणुकांमुळे दहावीची परीक्षा सात दिवस उशिरा सुरु झाली. तेवढ्याच दिवसांनी निकाल लांबला. गेल्या वर्षी 1 मार्चपासून सुरु झाली. त्याचा निकाल सहा जून रोजी लागला होता, असे गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.

आर्चीचा सैराट निकाल
सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरुने दहावीत 66.40 टक्के गुण मिळवत फर्स्ट क्लास मिळवला. संपूर्ण महाराष्ट्राला आर्चीच्या निकालाची उत्सुकता होती. पुणे विभागातून आर्चीने दहावीची परीक्षा दिली होती. याच वर्षी तिचा सैराटचा तमिळ रिमेक प्रदर्शित झाला. त्यामध्ये रिंकूने काम केले होते. दहावीचे वर्ष, सिनेमा व अभ्यास सांभाळत रिंकुने फर्स्टक्लास मिळवला.

विभागवार निकाल
पुणे 91.95
नागपूर 83.67
औरंगाबाद 88.15
मुंबई 90.09
कोल्हापूर 93.59
अमरावती 84.35
नाशिक 87.76
लातूर 85.22
कोकण 96.18