चिंचवड :- चिंचवडच्या आंबेडकरनगरमध्ये राहणा-या यशराज वाघमारे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. त्याचे आयआयटीचे शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असून त्याचे हे स्वप्न साकार होण्यासाठी नोव्हेल ग्रूप ऑफ इंस्टीट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी विद्यार्थी दत्तक उपक्रमाअंतर्गंत त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या आयएएस होईपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
घरची परिस्थिती हलाखीची
घरची परिस्थिती हलाखीची असतानाही हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशराजने चांगले गुण मिळविले आहेत. यशराजचे वडील बापु वाघमारे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपले घर चालवीत असतात. सकाळी साडेचार वाजता उठून भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करतात. त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत ते आपला व्यवसाय करतात. दोन मुलांच्या शिक्षणासाठी ते झटत आहेत. यशराजने वडिलांच्या कष्टांची जाण राखत प्रामाणिकपणे अभ्यासाला करून हे यश मिळविले.
यशराजच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक उपक्रमातून मदत
या यशानंतर त्याची पुढील शैक्षणिक वाटचाल चांगली व्हावी. त्याला चांगले व दर्जेदार शिक्षण घेता यावे. त्यातून त्याने आपले स्वप्न पूर्ण करून यशस्वी व्हावे. ही त्याच्या वडिलांची इच्छा आहे. परंतु, परिस्थिती हा त्यातला प्रमुख अडसर असल्याने यशराजच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक उपक्रमातून अमित गोरखे यांनी त्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. यशराजच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलण्याची तयारी दर्शविली असून त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईपर्यंत ते मदत करणार आहेत. या उपक्रमातून त्यांनी या पूर्वी देखील आर्थिक परस्थितीशी झुंज देणा-या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मदत केली आहे.