पुणे । महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात भाजपा, शिवसनेचे गुणगान तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांकवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे. याप्रकाराचा काँग्रेसने निषेध केला असून भाजपची प्रचार पुस्तिकाच दहावीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम म्हणून छापा, अशी उपरोधिक टीका केली आहे. कम्युनिस्ट पक्षानेही भाजपने केलेली ही सुधारण्यास भाग पाडू असा इशारा दिला आहे. दरम्यान, सर्व राष्ट्रीय राजकीय पक्ष व विभागवार प्रादेशिक पक्ष यांची अधिकृत भूमिका मांडल्याचे म्हणत राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत परांजपे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
आयोगाच्या संकेतस्थळानुसार माहिती
भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. तर शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यास झाली आहे, असा शिवसेनेचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत परांजपे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या यादीनुसार सर्वच राष्ट्रीय पक्ष व विभागवार प्रमुख प्रादेशिक पक्षांची माहिती पुस्तकामध्ये दिली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या स्थापना दिनांकानुसार सर्व राष्ट्रीय पक्ष व त्यांच्या भूमिकांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.
जाहिरातबाजीसाठी पाठ्यपुस्तके : विखे पाटील
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेखाबाबत तीव्र संताप केला आहे. विखे पाटील म्हणाले, भाजपा सरकारने जाहिरातबाजीसाठी पाठ्यपुस्तकांचाही गैरवापर सुरू केल्याचे स्पष्ट होते. गुणगान करण्यासारखी भाजपाची कोणतीही कामगिरी नाही. त्यांचा ना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे, ना स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीत योगदान आहे. हा मजकूर तातडीने वगळावा. सत्ताधारी पक्षांचे गुणगान गाऊन विरोधी पक्षांची प्रतिमा मलिन करण्याच्या हा प्रयत्न आहे, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, सरकारने बालभारतीच्या माध्यमातून अत्यंत खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे भविष्य घडविण्याची ताकद नाही, वर्तमानात राबविण्यासाठी कोणताही कार्यक्रम नाही, त्यांनी इतिहासाची मोडतोड करण्याचा एकमेव अजेंडा निश्चित केला आहे. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही; तसेच आम्ही या संदर्भात बालभारतीच्या अधिकार्यांची भेट घेऊन ही चूक सुधारण्यास भाग पाडू.
पुण्यात बालभारतीचा काँग्रेसकडून निषेध
भाजपने आता इतर राजकीय पक्षांचा इतिहास पुस्तकात न छापता सरळ भाजपची प्रचार पुस्तिकाच पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम म्हणून छापावी, अशी उपरोधिक टीका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकात भाजपबद्दल खोटी माहिती देत पक्षाचे गोडवे गायले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य शिक्षण मंडळाची पुस्तक छापणार्या पुण्यातील बालभारतीच्या कार्यालयात जाऊन याचा निषेध केला. हे पाठ्य पुस्तक बाद करावे, अन्यथा काँग्रेसकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. बालभारतीच्या इतिहास मंडळाचे विशेष अधिकारी मोगल जाधव यांना हे निवेदन देण्यात आले. या आक्षेपाबाबत इतिहास आणि राज्यशास्त्र समितीच्यासमोर विषय मांडण्यात येईल आणि सारासार विचार करून निर्णय घेतला जाईल, असे बालभारतीकडून सांगण्यात आले आहे.