दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कलचाचणी ऑनलाईन होणार

0

भुसावळ । दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कलचाचणी परीक्षा यंदाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारी ते मार्चदरम्यान कलचाचणी तसेच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेण्यात यावी, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळातर्फे मागील वर्षापासून कलचाचणी परीक्षा सुरू करण्यात आली होती. मागील वर्षी काही शाळांनी अनेक विद्यार्थ्यांची कलचाचणी उशिरा घेतली होती. यंदा मात्र वेळेत ही चाचणी घेणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

शिक्षणाचे नियोजन होणार सोयीचे

शालेय दशेतच विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे, याची माहिती व्हावी जेणेकरून दहावीनंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे? याचा ताण निर्माण होणार नाही. शिवाय पालकांसह विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणाचे नियोजनही करता यावे, या उद्देशाने मागील वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी घेतली जात आहे.

अहवाल निकालपत्रासोबत जाहीर होणार

मागील वर्षी काही शाळांनी अनेक विद्यार्थ्यांची कलचाचणी उशिरा घेतली होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये माध्यमिक शालान्त परीक्षेस प्रथम प्रविष्ट होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी त्यांच्या शाळेत प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेच्या कालावधीत म्हणजे 15 फेब्रुवारी ते मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. या कलचाचणीचा अहवाल एप्रिलमध्ये ऑनलाइन, तर माध्यमिक शालान्त परीक्षेच्या निकाल पत्रकाबरोबर छापील स्वरूपात जाहीर केला जाणार आहे. त्यानुसार शाळांना नियमांचे पालन करून कलचाचणी परीक्षा घ्यावी लागेल.

शाळांना दिल्या सुचना

कलचाचणीबाबत माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांनी एक शिक्षक नियुक्त करावा. याबाबतची माहिती संकेतस्थळावर नोंदवावी आणि हे संकेतस्थळ रोज अपडेट होत असल्याने माहिती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे संगणक उपलब्धतेप्रमाणे गट तयार करावेत आणि निर्धारित वेळेत कलचाचणी पूर्ण करावी. नियमित विद्यार्थ्यास सदर कलचाचणी अनिवार्य आहे. त्यामुळे चाचणीस उपस्थित असणार्‍यांच्या पत्रकावर स्वाक्षरी अनिवार्य आहे. उपस्थितीपत्रके प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांच्या गुणपत्रकाबरोबरच विभागीय मंडळात जमा करणे सक्तीचे आहे. यंदा दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी परीक्षा सक्तीची आहे. याबाबत सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.