दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घ्या!

0

पुणे । दहावीच्या लेखी परीक्षेसंदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळ बोर्डाने आता शाळांना नव्याने सूचना दिल्या आहेत. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ज्या कालावधीत घेतल्या जातात. त्याच कालावधीत शाळांमध्येही कलचाचणी घ्या, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. मात्र, ज्या शाळांमध्ये संगणक नाही किंवा वीज नाही, अशा शाळांबाबत मोठा प्रश्‍न उपस्थित रहाणार असल्याचे दिसत आहे.

मागील दोन वर्षांपासून राज्य मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून कलचाचणी घेण्यात येत आहे. इयत्ता दहावीच्या या वर्षीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 10 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घेण्याच्या सूचना आहेत. याच कालावधीत शाळांनी बॅचेस करत विद्यार्थ्यांची ऑनलाईन कलचाचणीही घ्यावी, असे आदेश राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. यासाठी शाळेला संगणक व्यवस्था तसेच या कामासाठी शिक्षक नियुक्ती करण्यास सांगितले आहे. तसेच ही परीक्षा झाल्यानंतर पुर्तता पत्र मिळणार असून हे पूर्तता पत्र शाळांनी मंडळांना जमा करणे आवश्यक आहे. नियमीत परीक्षा देणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना कलचाचणी ही अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान गावांतील अनेक शाळांमध्ये संगणक तर सोडाच परंतु वीजही उपलब्ध नाही अशा शाळांनी काय करावे याबाबत काहीच सूचना देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे दोन वर्षापूर्वी जवळपास एक लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी झालीच नव्हती.