नाशिक – शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर शहरातील एका विद्यार्थिनीने दहावीला कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी एकनाथ बेडकुळे (१६) असे त्या मृत मुलीचे नाव आहे. साक्षीने शुक्रवारी सायंकाळी स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पेठरोडवरील फुलेनगरमध्ये राहणाऱ्या साक्षीने शुक्रवारी दुपारी दहावीचा निकाल ऑनलाईन पाहिला.
तिला दहावीत ५६ टक्के गुण मिळाले होते. ती दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णही झाली होती. मात्र, जास्त मार्क का पडले नाही? यातून नैराश्य आले आणि तिने टोकाचे पाऊल उचलत स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली. दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साक्षी बेडकुळे ही स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी होती.