दहावी-बारावीच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अवघे 38 अर्ज

0

नगरसेवकांच्या हट्टापायी मुदतवाढ दिल्याची शंका

पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांना देण्यात येणार्‍या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेस देण्यात आलेल्या मुदतवाढीत 10वीसाठी 24, तर 12वीच्या शिष्यवृत्तीसाठी अवघे 14 अर्ज आले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा आग्रह धरणार्‍या महापालिका पदाधिकार्‍यांचा दावा फोल ठरला आहे.

महापालिका हद्दीतील इयत्ता 10 वी आणि 12 वीमध्ये खुल्या गटांतील मुलांना असलेल्या दहावीसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजने अंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. दहावीसाठी 15 हजार, तर 12 वीसाठी 25 हजार रुपये दिले जातात. यावर्षी ऑनलाइन पद्धतीने दि.25 जुलै ते 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, तोपर्यंतही दहावी, बारावीचे प्रवेश झालेले नसल्याने ही मुदत 29 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. या मुदतीत 13 हजार अर्ज पालिकेस प्राप्त झाले असून त्याची तपासणी सुरू आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस ही शिष्यवृत्ती मुलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यास सुरूवात झाली आहे. असे असतानाच, प्रशासनाने अचानक दि.24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत शिष्यवृत्ती भरण्यास मुदतवाढ दिली होती. त्यात अवघे 38 अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रशासनावर टाकला दबाव

भाजपच्या काही नगरसेवकांचे नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांच्या मुलांचे दहावी आणि बारावीचे अर्ज मुदतीत भरण्यात आले नव्हते. त्यामुळे या नगरसेवकांनी 29 सप्टेंबरनंतर समाज विकास विभागाकडे हे अर्ज ऑफलाइन घेण्याचा आग्रह धरला जात होता. त्यासाठी दबावही आणला जात होता. मात्र, हे शक्य नसल्याचे समोर येताच, प्रशासनावर दबाब टाकून थेट अर्जाची मुदत संपल्यानंतर महिन्याभराने पुन्हा आठवड्याभराची मुदत देण्यात आली. त्यावेळी अनेक शाखांचे प्रवेश रखडले असून शेकडो मुलांचे अर्ज राहिल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात अवघे 38 अर्ज आले असल्याने केवळ नगरसेवकांच्या हट्टापायी प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरून ही मुदतवाढ मिळविल्याचे समोर आले आहे.