भुसावळातील नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ- दहावी-बारावीत उल्लेखनीय यश मिळवणार्या 96 गुणवंतांसह त्यांच्या पालकांचा गौरव शहरातील दत्त नगरातील दत्त मंदिराच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांकचे 20 चे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर (पिंटू) यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा.डॉ.सुनील नेवे, वैद्य रघुनाथ सोनवणे, पांगळे यांची उपस्थिती होती.
प्रेम, उत्तेजन हे तर मनाचे टॉनिक -ठाकूर
प्रास्ताविकात महेंद्रसिंग ठाकुर म्हणाले की, प्रेम, उत्तेजन, कौतुक हे मनाचे टॉनिक असून ईतर विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी मान्यवरांचे स्वागत पिंटू ठाकुर, उमेश ठाकुर, विकास राखुंडे, प्रदीप कोळी, आकाश राजपूत, प्रवीण पाटील, राहुल वरणकर, संजय ठाकुर यांनी केले. याप्रसंगी दहावी-बारावीतील गुणवंतांना फोल्डींग बॅग, गुलाबपुष्प तर आईस साडी-पंजाबी ड्रेस व वडिलांना रुपाल-टोपी देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सत्काराने विद्यार्थी भारावले ; वॉर्डात पहिलाच उपक्रम
विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सहृदय सत्कार झाल्याने सारेच भारावले. वॉर्ड स्तरावर अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत असल्याने अनेकांनी नमूद करीत नगरसेवक पिंटू ठाकूर यांना धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांतर्फे खुशबू कुरेशी, खुशी सपकाळे, कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.
ध्येय गाठण्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक -आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, सातत्याने केलेला अभ्यास व जिद्द, चिकाटीने विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. हे यश असेच टिकवून ठेवण्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक असून सद्गुण-सदाचार माणसाला जीवनात मोठ बनवतात, असेही ते म्हणाले. भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांची आवड-निवड पाहून पुढे त्यांना त्यांचे करीअर करू द्यावे. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पिंटू ठाकुर यांचा उपक्रमशील नगरसेवक असा गौरव करीत विद्यार्थ्यांनी परीस्थितीवर मात करून असेच उत्तुंग यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार वैद्य रघुनाथ सोनवणे यांनी मानले. संजय ठाकुर, जगदीश ठाकुर, अरुण धनगर, रितेश शिंदे, विक्की ठाकुर यांनी परीश्रम घेतले.