पुणे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात येण्याबाबत वेळेची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होईपर्यत म्हणजेच 11 वाजेपर्यत केंद्रात येता येईल.
अपवादात्मक परिस्थितीत पेपर सुरू झाल्यानंतरही प्रवेश देण्यात येईल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी अर्ध्या तासांपूर्वी म्हणजे 10.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच, परीक्षेला उशिरा येणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होईपर्यत म्हणजेच अकरा वाजेपर्यत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर देखील एखाद्या विद्यार्थ्यासोबत अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास संबंधित प्रकरणाची तपासणी करून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.