दहावी-बारावी फेरपरीक्षांचा वेळापत्रक जाहीर

0

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाचे नुकसान झाले आहे. सर्वच क्षेत्राला याचा फटका बसलेला असताना शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसलेला आहे. परीक्षेबाबत अद्याप कोणतेही निश्चित धोरण ठरलेले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे. त्यात दहावी-बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेबाबत मोठा निर्णय झालेला आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच एटीकेटीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. 6 ऑक्टोबरपासून या परीक्षा होणार आहे. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबरदरम्यान, बारावीची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार आहे. याशिवाय, दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबरदरम्यान, दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान, तर बारावीची प्रात्याक्षिक, लेखी आणि श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल.

तयार करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात काही अभिप्राय, सूचना अथवा दुरुस्ती असेल, तर ते 17 ऑगस्टपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. यासाठी मंडळाने secretary.stateboard@gmail.com हा ई-मेल आयडीदेखील जाहीर केला आहे.