नाशिक : मार्च व एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आणि 12 वीच्या उच्च माध्यमिक लेखी व प्रात्याक्षिक परिक्षांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी लेखी परीक्षेचा कालावधी 4 मार्च,2022 ते 30 मार्च, 2022 पर्यंत असून प्रात्याक्षिक परीक्षेचा कालावधी 3 मार्च, 2022 पर्यंत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) लेखी परीक्षेचा कालावधी 4 एप्रिल, 2022 पर्यंत असून प्रात्याक्षिक परीक्षेचा कालावधी 25 फेब्रुवारी,2022 ते 14 मार्च, 2022 पर्यंत असणार आहे.
वरील नमूद परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा संचालनासाठी कार्यान्वित असलेले शासकीय अधिकारी ,कर्मचारी आणि शासकीय कार्यालये यांना परीक्षेचे वेळेपत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावी, आऊट ऑफ टर्न, प्रात्याक्षिक परीक्षा, परीक्षेसंबंधी अन्य माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदतवाहिनीची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच परीक्षा काळात नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडी-अडचणींची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी या मदतवाहिनीचा उपयोग करु शकतात. तसेच परीक्षा कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडी अडचणींचे निरसन करण्यासाठी सर्व संबंधितांनी 0253-2950410,0253-2945241 व 0253-2945251 या मदत वाहिनींवर सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत संपर्क साधावा, असेही विभागीय सचिव श्री. अहिरे यांनी कळविले आहे.