दहा आमदारांना एप्रिल फुल!

0

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावेळी विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित केलेल्या 19 आमदारांपैकी 9 आमदारांचे निलंबन शनिवारी मागे घेण्यात आले. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. निलंबनाची कारवाई कुठल्याही सूडबुद्धीतून नाही तर शिस्तभंगातून केली होती, असे बापट यांनी स्पष्ट केले. निलंबन रद्द केलेल्या आमदरांमध्ये संग्राम थोपटे, दीपक चव्हाण, अमित झनक, वैभव पिचड, डी. पी. सावंत, नरहरी झिरवाळ, दत्तात्रेय भरणे, अवधूत तटकरे, अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.

गिरीश बापट यांनी या 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असा प्रस्ताव अध्यक्षांसमोर ठेवला होता. उर्वरित दहा आमदारांना मात्र सरकारच्या या निर्णयाने धक्का बसला असून, आपल्याला सरकाने ‘एप्रिल फुल’ बनविल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अर्थसंकल्पावेळी गोंधळ घातला होता. यानंतर गोंधळ घालणार्‍या विरोधी पक्षाच्या एकूण 19 आमदारांना 22 मार्चला 9 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. या कारवाईनंतर राज्य सरकारवर टीका झाली होती. तसेच आमदरांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही केली होती. यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिले होते.