जळगाव : जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असून, रविवारी एकाच दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात या मोकाट कुत्र्यांनी दहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यात तरूणांसह एका महिलेचाही समावेश आहे. या जखमींवर सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. महापालिका मात्र, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत उदासीन असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरासह तालुकाभरात झुंडीने भटके कुत्रे स्वैरपणे उच्छाद मांडत असतात. अनेकवेळा कुत्रे आडवा आल्याने गाडी पडून दुचाकीचालकांना किरकोळ जखमा होण्याचे प्रकार घडत असून मोकाट कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनाही दिवसांगणिक वाढत आहेत. कुत्र्यांचा चावा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात दहा जणांवर उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनिल पांडूरंग धनगर (वय 29 रा. पिंप्राळा), बायजाबाई अशोक सोनवणे (वय 43 रा. दिनकरनगर), विजय प्रकाश कोळी (वय 21 रा. विदगाव), सचिन अशोक इंगळे (वय 22 रा.एमआयडीसी), विजयकुमार सलमान पुरीया (वय 40 रा. वांद्रानगर), केतन रविंद्र खोंडे (वय 13 रा. चौघुले प्लॉट), केतन किरण चव्हाण (वय 7 रा. सदगुरु नगर), अमरसिंग जनू चव्हाण (वय 45 रा. कुंभारतांडा), विलास अरूण चव्हाण (वय 7 रा. कुंभारतांडा), शेख शकीर शेख ईस्माईल (वय 50 रा. यावल) यांचा समावेश आहे.या मोकाट कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने लहान मुलांना घराच्या अंगणात देखील खेळण्यास पालकवर्ग पाठवण्यास घाबरत आहे. भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत असली तरी या भटक्या कुत्र्यांना आवरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप सापडलेले नाही.