धुळे । देवपूरातील नेहरुनगरात तब्बल दहा दिवसांनंतर झालेला पाणीपुरवठाही दुषित असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संमिश्र वसती असलेल्या या भागात अनेकांनी थेट टाकीत पाणी टाकल्याने त्यांना त्यांच्याकडे असलेले थोडे पाणीही फेकून देण्याची वेळ आली. तर नळावर पाणी भरणार्या गरीब महिलांमुळे ही बाब उघडकीस आली. पिण्याच्या पाण्यात थेट नाल्याचे पाणी आणि एका महाविद्यालयातील गळतीमुळे साचलेले घाण पाणी मिसळल्याने हा दुषित पाणीपुरवठा झाल्याचे उघडकीस आले. सुटी असल्याने नागरिकांना मनपा गाठता आली नाही.
देवपूरातील विष्णूनगर, चंदननगर, संत रोहिदास गार्डन परिसर, नेहरु नगर, भांडपूरा या भागात नेहरुनगरात असलेल्या शनिमंदीरा जवळील पाणी टाकीवरुन पिण्याचे पाणी सोडण्यात येते. गेल्या दहा दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने सकाळी पाणी येताच अनेकांनी थेट मोटर सुरु करुन पाण्याच्या टाकीत पाणी सोडले. तर गरीब वसतीत महिलांनी भांडी घेवून नळावर धाव घेतली. यावेळी अत्यंत घाण पाणी येत असल्याने या दुषित पाणी पुरवठ्याची ओरड झाली.
संबंधितांना केल्या सूचना
यावेळी नागरिकांनी दुषित पाण्यासंबंधी मनपाचे ओव्हरसियर पावटे आणि निखील टकले यांना फोनही लावले. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने अखेरीस शहर अभियंता कैलास शिंदे यांना फोन लावण्यात आला. शिवाय माहिती म्हणून आयुक्तांनाही मेसेज केला गेला. कैलास शिंदे हे बाहेरगावी एका बैठकीत असले तरी त्यांनी फोन उचलून नेमकी काय तक्रार आहे हे जाणून घेतले आणि तात्काळ संबंधीतांना सूचना केल्या.