राष्ट्रवादी, शिवसेना, सामाजिक संघटनांकडून आरोपांच्या फैरीवर फैरी
पिंपरी-चिंचवड : शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने महापालिकेत बसविलेल्या ‘भाजपा’ला अवघ्या दहाच महिन्यांत आरोपांनी घेरले आहे. गेल्याच महिन्यात रस्ते विकासासासाठी 425 कोटींच्या कामांना दिलेली मान्यता हा कळीचा मुद्दा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह, शिवसेना आणि विविध सामाजिक संघटना दररोज फैरीवर फैरी झाडत आहेत. साहजिकच ‘भाजप’च्या सुसाट गाडीला ब्रेक लागला आहे. त्यातच निवडणूक लढविताना दिलेल्या अनेक आश्वासनांपासून घेतलेली पलायनवादी भूमिका आणि नेत्यांची चुप्पी यामुळे भाजप बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. त्यातच आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भूमिका सत्ताधार्यांच्या बाजूनेच असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण काही आक्रमक पदाधिकारी आमची अक्षरश: लाज काढतात अशी कैफीयत घेवून आयुक्तांकडे गेलेल्या अधिकार्यांना गप्प बसण्याचा सल्ला मिळतो. त्यामुळे आयुक्तांवर प्रशासनही नाराज आहे. ही सर्व माहिती ‘वर्षा’वर पोहोचल्यामुळेच मंगळवारी ‘झाडाझडती’ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली होती. मात्र, काही कारणांमुळे ती रद्द झाल्याने पदाधिकारी व आयुक्तांनी सुस्कारा सोडला आहे.
शिवसेनेकडून अभ्यासपूर्ण आरोप
स्थायी समितीने महिन्याभरापूर्वी रस्ते विकासाच्या 425 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. यामध्ये ‘रिंग’ झाली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. मात्र, त्यांच्या आरोपाला सत्ताधार्यांनी अजिबात महत्व दिले नाही. आयुक्तांनी देखील पुरावा द्या, कारवाई करतो, असे सांगून हात झटकले. परंतु, 425 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या मान्यतेची शिवसेनेने गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सर्व माहिती मागविली. ठेकेदार कोण आहेत. रस्त्यांची कामे कशा पद्धतीने दिली आहेत, याची सविस्तर माहिती मागविली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे आणि सुलभा उबाळे यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षासह पालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. रस्ते विकासकामासाठी 60 टक्के जागा ताब्यात असताना आयुक्तांनी 425 कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे काढली. या कामांमध्ये ठेकेदारांनी संगनमत केल्याने सर्व कामे निविदा रकमेच्या चार ते दहा टक्के वाढीव दराने देण्यात आली आहेत. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्ती निश्चित करण्यात आला आहेत.
आयुक्तही आरोपीच्या पिंजर्यात
या सर्व व्यवहारात करदात्यांच्या 90 कोटी रुपयांची लूट झाली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सहमतीनेच भाजप नेत्यांनी महापालिका तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंध विभाग आणि अमंलबजावणी संचानलय (ईडी) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही, शिवसेना नेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर भाजपने ‘होलसेल’ पद्धतीने भ्रष्टाचार सुरु केला आहे. भ्रष्टाचारात सर्वांना मागे टाकले असून गेल्या नऊ महिन्यात तब्बल 300 कोटी रुपयांवर दरोडा टाकल्याचा आरोप केला. तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. आयुक्तांच्या सहमतीनेच हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यांना भाजप पदाधिकार्यांच्या घरगड्याची उपमा देखील देऊन टाकली.
केवळ आमदार महेश लांडगेंकडून प्रत्युत्तर
यामुळे शहराच्या राजकारणात सनसनाटी निर्माण झाली. राजकीय आणि पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच गेल्या नऊ महिन्यांपासून सुसाट सुटलेल्या भाजपच्या गाडीला जरा ब्रेक लागला. त्यानंतर भाजपचे संलग्न भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आमदार लांडगे म्हणाले, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसह सर्वंच पक्षांनी अन्याय केला. गेल्या 35 वर्षांपासून समाविष्ट गावे विकासापासून वंचित ठेवली. पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून आम्ही समाविष्ट गावाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गावामध्ये रस्ते करण्यात येणार आहेत. परंतु, यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार शिवसेनेला झाला असून त्यांना समाविष्ट गावांतील विकासकामांमुळे पोटशूळ उठला आहे समाविष्ट गावातील विकासकामे पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा, आरोप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीपेक्षा भाजपचा पालिकेतील कारभार चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचा आरोप करणारी शिवसेना खरी शिवसेना आहे की राष्ट्रवीदीची ’बी’ टीम आहे, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजेंद्र जगतापांचा हल्लाबोल
हे प्रकरण शांत होते की नाही तोवर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका प्रशासन नवी सांगवी, पिंपळेगुरव परिसरातील भाजप नेत्यांच्या व्यावसायिक अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचा गंभीर आरोप केला. बांधकामांची छायाचित्रे देखील माध्यमांना दिली. या आरोपांना स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी जगताप यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. पिंपळेगुरवमधील राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनींची अनधिकृत व्यवहाराद्वारे विक्री केली आहे. त्याच जागांवर आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यांना अभय मिळत आहे. ही अनधिकृत बांधकामे करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून लाखो रुपयांचा हप्ता गोळा केला गेल्याचा आरोप केला. आता ते माजी नगरसेवक याप्रकरणी काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पक्षश्रेष्ठींकडून कानउघाडणीचे वृत्त
महापालिकेतील भाजपच्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या दिवसेंदिवस उघड होत असलेल्या प्रकारांमुळे पक्षश्रेष्ठींनी या संपूर्ण प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली असून आमदार व महापालिकेतील इतर नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, असे प्रसिद्धीपत्रक शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी काढले आहे. त्याचबरोबर शहरातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात शनिवारी (दि.20) विरोधक आणि शहरातील विविध सामाजिक संघटना एक दिवसाचे धरणे आंदोलन देखील करणार आहेत.
सत्ताधार्यांविरोधात प्रथमच ‘आवाज’
या आरोप-प्रत्यारोपांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची ही चुणूक असल्याचेही यामुळे बोलले जाऊ लागले आहे. तसेच गेल्या नऊ महिन्यांपासून सत्ताधार्यांना बिलकूल विरोध होताना दिसत नव्हता. विरोधी पक्षनेतेपद असलेल्या राष्ट्रवादीला मरगळ आली आहे. त्यांचे हात दगडाखाली अडकले असल्यामुळेच राष्ट्रवादीचे नगरसेवक मूग गिळून गप बसले असल्याची जोरदार, चर्चा शहरात रंगली आहे. विरोधी पक्षनेते योगेश बहल तर पालिकेत फिरकत देखील नाहीत. केवळ महासभेला येतात आणि त्रोटक विरोध केल्याचा भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येतात. शिवसेना आक्रमक झाल्यामुळे सत्ताधारी देखील नरमले आहेत.