दहा मिनिटात आटोपली पोलीस दलाची गणेश मंडळासोबतची बैठक

0

बैठकीला उशीर झाल्याने अनेकांची नाराजी ; बैठकीपूर्वीच काढता पाय

ळगाव- पोलीस मुख्यालय आवारातील मंगलम हॉलमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टिने सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा क रण्यासाठी पोलीस प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. दुपारी 1 वाजता बैठक सुरू होणार होती परंतु वरीष्ठ अधिकारी वेळेवर न आल्याने बैठक दुपारी 2 वाजता सुरू झाली. यामुळे अनेक गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे आहेत त्याच पदाधिकार्‍याच्या उपस्थित केवळ दहा मिनिटातच ही बैठक आटोपण्यात आली.

गणेशोत्सव लोकोत्सव व्हावा – डॉ.पंजाबराव उगले
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्यासह पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवाच्या तयारीला सुरूवात केली असून परवानगीसाठी एक खिडकी उपक्रम यावर्षी देखील राहणार आहे. सर्व मंडळांना विहित वेळेत परवानगी दिली जाईल. नियमांचे, शिस्तीचे पालन केल्याशिवाय गणेशोत्सव साजरा होवू शकत नाही. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मंडपांचा आकार, आवाजाची तिव्रता यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टिने ही पुर्वतयारी बैठक असून यापुढे देखील बैठक होईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली.

मंडळाच्या पदधिकार्यांनी मांडल्या समस्या
गणेशोत्सव मंडळांंच्या पदधिकार्यांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली असता कासमवाडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था झाली असून गणेशमूर्ती आणतांना प्रचंड कसरत करावी लागणार आहे, कासमवाडीत शनिवारी भरणार्या बाजारामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असते, त्यामुळे त्याठिकाणी दोन वाहतूक कर्मचार्यांची नेमणूक करावी अशी मागणी एका गणेश मंडळ कार्यकर्त्याने केली. तसेच मंडळांना अद्याप मनपा प्रशासनाकडून परवानगी दिली जात नसल्याचे तरूणांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. सूत्रसंचालन व आभार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी केले.