दहा मिनीटात 300 कोटीच्या कामांचे भूमीपुजन

0

30 मिनीटात डिपीडीसी, 20 मिनीटात टंचाई,

पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी तासाभरात गुंडाळला जिल्ह्याचा आढावा

जळगाव – 30 मिनीटे डिपीडीसी, 20 मिनीटे टंचाई आणि अवघ्या 10 मिनीटात 300 कोटीच्या कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करून पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जळगावसारख्या मोठ्या जिल्ह्याचा आढावा अवघ्या तासाभरात गुंडाळला. दरम्यान या बैठकांकडे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.
राज्याचे महसुल तथा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे तब्बल तीन महिन्यानंतर जळगाव दौर्‍यावर आले होते. यापुर्वी दोन वेळा त्यांच्या दौर्‍याचे नियोजन झाले होते. मात्र मुंबईतील व्यस्त कामांमुळे त्यांचे हे दौरे रद्द झाले होते. गेल्या दोन दिवसापुर्वी देखिल त्यांचा दौरा प्रशासनाला प्राप्त झाला होता. हा दौरा होईल की नाही, अशीच शंका उपस्थित केली जात होती. अखेर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील अनेक कामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जळगावात हजेरी लावली. ना. पाटील यांचा हा दौरा मात्र आज देखिल धावताच ठरला कारण कॅबीनेट बैठकिचे निमीत्त पुढे करून अवघ्या तासाभरात ना. पाटील यांनी जिल्ह्याचा आढावा गुंडाळुन मुंबईकडे प्रयाण केले. ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीपुर्वी ना. पाटील यांनी 20 मिनीटे जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईचा धावता आढावा घेतला. यात माजी महसुलमंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. स्मिता वाघ, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा परीषद सदस्या डॉ. निलम पाटील यांनी पाणी टंचाई संदर्भात प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी लेटरहेडवर जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
30 मिनीटात आटोपली डिपीडीसी
जिल्हा नियोजन मंडळामार्फत जिल्हा वार्षिक विकास योजनांची कामे केली जातात. मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या या मंडळाची ही बैठक अवघ्या 30 मिनीटात पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी गुंडाळली. सन 2018-19 या आर्थिक वर्षात 89 टक्के निधी खर्च झाला असुन उर्वरीत निधी खर्चाला पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी दिली. तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 435 कोटीसह अतिरीक्त 16 कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजूरी देण्यात आली.
10 मिनीटात 300 कोटीच्या कामाचे लोकार्पण
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी पालकमंत्र्यांच्या या धावत्या दौर्‍यातही वेळ साधुन 300 कोटींच्या कामाचे लोकार्पण उरकुन घेतले. यात जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परीसरात अल्पसंख्यांक मुलींसाठी वसतीगृह बांधणे, यावल येथील तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे (टप्पा-1), यावल, हरिपुरा, टाकरखेडा, निमगाव, भादली, आसोदा, जळगाव रस्त्याची हायब्रीड अ‍ॅन्युटी अंतर्गत सुधारणा करणे, भिकनगाव, पाल, खिरोदा, सावदा, आमोदा, रस्ता अ‍ॅन्युटीअंतर्गत दुरूस्ती करणे, खिरोदा, फैजपुर, चिनावल, विवरा, कुसुंबा रस्त्याची सुधारणा करणे या कामांचा समावेश आहे.