दहा रूपयांचे नाणे दिल्याने ग्राहकाला मारहाण

0

जळगाव । दहा रूपयांचे नाणे हे बंद झाले नसून ते स्वीकारू शकतात असे रिझर्व्ह बँकेकडून वारंवार जाहिर करण्यात आले असून सुध्दा दहा रूपयांचे नाणे बंद झाले असल्याची अफवा नागरिकांमध्ये आजही दिसून येत आहेत. त्यातच आज ग्राहकाने दहा रूपयांचे नाणे दिले म्हणून एका चहा पावडर विक्रेत्याने ग्राहकाला शिवीगाळ करत चापटांनी मारहाण केल्याची घटना दुपारी 12.30 वाजता फ्रुट गल्लीत घडली. याप्रकरणी ग्राहकाने शहर पोलिस स्टेशन गाठत चहापावडर विक्रेत्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

विके्रत्याचा नाणे घेण्यास नकार
शहरासह जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून अधिकृत 10 रुपयांचे नाणे चलनातून बंद झाले असल्याची अफवा पसरली आहे. यावेळी कोणीही दहा रूपयाचे नाणे स्विकारत नसल्याने सुट्या पैश्यांची चणचण आता भासू लागली आहे. यातच काही खरेदी केल्यावर 10 रुपयांचे नाणे दिल्यावर विके्रता ते स्विकारत नसल्याने नागरिकांची चांगलीच फजिती होती. रिझर्व्ह बँक तसेच स्टेट बँकेकडून दहा रूपयांचे नाणे हे स्विकारू शकतात असे जाहिर केले असून सुध्दा अफवांच्या भ्रमात पडून कोणीही नाणे स्विकारत नाही. तर काही विक्रेते चक्क चिठ्ठयांवर नाणे स्विकारले जात नसल्याचे लिहून देत आहेत. यातील आज एक प्रकार घडला. समता नगर येथील रहिवासी बाळू आत्माराम महाजन वय-37 हे मुलासोबत शहरात खरेदीसाठी आले होते. यानंतर ते फ्रुट गल्लीत असलेल्या प्रितम चहा या दुकानावर चहा पावडर खरेदी करण्यासाठी गेले. 38 रुपयांची चहा पावडर खरेदी केल्यानंतर त्यांनी दहा-दहा तीन नोटा व एक दहा रुपयांचा नाणे दिले.

अन् शहर पोलिस स्टेशन गाठले
यावेळी दुकान मालकांनी नाणे स्विकार करण्यास नकार देत बाळु यांच्याशी वाद घातला व त्यांना शिवीगाळ करून चक्क चापटांनी मारहाण केली. यावेळी परिसरातील नागरिकांची त्या ठिकाणी चांगलीच गर्दी केली. मारहाण झाल्यानंतर त्यांनी मुलाला घेवून शहर पोलिस स्टेशन गाठत प्रितम चहा पावडर दुकान मालकांविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस ठाण्यात दुकानामालकाविरूध्द अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी देखील जिल्हा रूग्णालयासमोर असलेल्या एका मोबाईल रिचार्ज दुकान दाराने तर ग्राहकाला दहा रूपयांचे नाणे स्विकारले जात नसून ते बंद झाले असे एका चिठ्ठीवरून लिहून दिले होते. त्यातच रिक्षाचालक, पेट्रोलपंपधारक, भाजीपाला विके्रते हे देखील नाणे स्विकारत नसल्याने नागरिकांची फजिती होत आहे.