नंदुरबार । नोटाबंदीनंतर सर्वत्र आर्थिक व्यवहार सुरळीत होत असतांनाच आता दहा रुपयांच्या डॉलरचे भूत सर्वसामान्य माणसांच्या मुनगटीवर बसले आहे. नंदुरबार शहरात दहा रुपयाच्या शिक्का काही व्यवसायीक स्विकारत नसल्याने संभ्रमास्था निर्माण झाली आहे. बंदी नसतांना केवळ अफवांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता याबाबत खुलासा करुन दहा रुपये शिक्का बंदीच्या अफवांना थोपविण्याची गरज निर्माण झाली आहे. देशात नोटबंदी झाल्यानंतर सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. या काळात दहा आणि वीस रुपये अशी सुट्टी नाणी मिळणे देखील मुश्किल झाले होते.
व्यवसायीक दोन, तीनच नाणी स्वीकारतात
किराणा दुकान, पेट्रोलपंप, भाजीमंडई, हॉटेल या सर्वच ठिकाणी दहा रुपयाचे डॉलर देवून खरेदी केली जात आहे. परंतू बहुतांश व्यवसायिकांमध्ये वादविवाद देखील होतांना दिसून येतो. समजदार व्यवसायीक दहा रुपयाचे शिक्के घेतो, पण ते देखील दोन किंवा तीनच. दोनशे, पाचशे रुपयांचे दहाचे शिक्के घेण्यास साफ नकार दिला जात आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. याचा फायदा घेत हुशार लोकांनी कमिशनवर दहा रुपयाची नाणी घेण्याचा धंदा सुरू केला आहे.
ग्राहकांची होतेय् पायपीट
दहा रुपयाच्या शिक्का बंद झालेला नाही. परंतू अफवांना बळी पडून आर्थिक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ नागरीकांवर येवून ठेवली आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेवून जाहीर खुलासा करणे गरजेचे आहे. दहा रुपयाचा शिक्का बाजारात घेवून खरेदी करण्यासाठी निघालेले अशोक जाधव (कैकाडी) यांना धक्कादायक अनुभव आले. दहा रुपयांचे शिक्के, त्यांच्याकडून घेण्यास अनेक व्यवसायिकांनी नकार दिल्याचे ते सांगतात. कमिशनवर दहा रूपयांची नाणे घेतल्याने याचा फटका मात्र भोळ्या-भाबड्या लोकांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गृहीणींची वाढली डोकेदुखी
सध्याच्या स्थितीत परिस्थिती सुधारत चालली असतांनाच आता दहा रुपयाच्या चलणी शिक्क्यांची डोकेदुखी वाढली आहे. दहा रुपयाच्या शिक्का (डॉलर) बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आल्याने त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर होतांना दिसून येत आहे. अनेक गृहीणींनी किंवा लहान मुलांनी चिल्ड्रेन बँकच्या माध्यमातून दहा रुपयाच्या नाणी साठवून ठेवले आहेत. ते आता बाहेर निघत असल्याने आफत निर्माण झाली आहे.