रोहतक : दोन साध्वींवर बलात्कार आणि लैंगिक शोषणप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी सोमवारी डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला प्रत्येकी दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. या दोन्ही गुन्ह्यात त्याला एकूण 20 वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. या शिवाय, न्यायालयाने त्याला एका गुन्ह्यात 15 व दुसर्या गुन्ह्यात 14 लाख रुपये असा 29 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. शिक्षा ठोठावताच गुरुमीत रामरहीम ढसाढसा रडू लागला. हात जोडून त्याने आपली शिक्षा कमी करण्याची मागणी केली. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांनीही त्याच्या समाजसेवेचा हवाला देत, शिक्षा कमी करण्याची विनंती केली. परंतु, आरोपीने आपल्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा गैरफायदा घेत गुन्हा केला असे नीक्षून सांगत, न्यायाधीशांनी आपल्या आदेशावर ठाम असल्याचे सांगितले. रोहतक येथील सुनरिया कारागृहातच न्यायालय भरवून हा निकाल देण्यात आला. कारागृहाबाहेर जमावबंदी आदेश लागू होता. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश हरियाणाचे पोलिस महासंचालक बी. एस. संधू यांनी दिले होते. रोहतक येथील तणावग्रस्त स्थिती पाहाता, खास हेलिकॉप्टरने न्यायाधीश सिंह यांना कारागृहात आणले गेले. हरियाणा व पंजाबमध्ये हायअॅलर्ट जारी करण्यात आला असून, भारतीय लष्कराच्या 28 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सीबीआय न्यायालयाने गुरुमीत सिंग याला दोषी ठरविताच, त्याच्या समर्थकांनी दंगली घडविल्या होत्या. त्यात 38 लोकांचे बळी गेलेत, तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी झाली होती. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई डेरा सच्चा सौदाच्या मालमत्तेतून करण्याचे आदेश यापूर्वीच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वसामान्य कैद्यासारखे वागविणार!
विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुमीत रामरहीम सिंग याला 2002च्या दोन साध्वी तरुणींवरील बलात्कार व लैंगिक शोषणप्रकरणी प्रत्येकी 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व रोहतक कारागृहाकडे नेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन कैद्याची कपडेही त्याला देण्यात आली. 1997 असा त्याचा कैदी नंबर पडला आहे. विशेष बराकीत त्याची कारागृह प्रशासनाने व्यवस्था केली होती. इतर कैद्यांपेक्षा कोणतीही वेगळी सुविधा त्याला देण्यात येऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश विशेष हेलिकॉप्टरने कारागृहात भरविण्यात आलेल्या कोर्टात आले होते. दुपारनंतर त्यांनी या खटल्यात शिक्षा ठोठावली. यावेळी गळितगात्र झालेला हा स्वयंघोषित अवतारी पुरुष अक्षरशः ढसाढसा रडला व माफीसाठी गयावया करू लागला होता. 50 वर्षीय गुरुमीत याने एमएसजी या चित्रपटात नायकाची भूमिका केली होती.
शिक्षा एकाचवेळी भोगावी लागणार!
गुरुमीत रामरहीम सिंग याचे वकील एस. के. नरवाना यांनी सांगितले, की बलात्कार व लैंगिक शोषणाच्या दोन प्रकरणात प्रत्येकी दहा अशी एकूण 20 वर्षे कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. तसेच, 29 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम दोन्ही पीडितांना 15 व 14 लाख अशा स्वरुपात द्यावी लागणार आहे. या दोन्ही शिक्षा लागोपाठ भोगायच्या नसून, त्यातील कलम 376 व 506 कलामांतर्गत दोषी ठरवून दिलेली शिक्षा मात्र एकाचवेळी भोगावी लागणार आहे, असेही अॅड. नरवाना यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दुसरीकडे, सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे डेरा सच्चा सौदाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, रोहतकचे जिल्हाधिकारी अतुल कुमार यांनी सांगितले, की हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिस, निमलष्करी व लष्करी दलांना देण्यात आल्या आहेत. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, संवेदनशील शहरात उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. स्थानिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहनी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते.
ठळक बाबी
* सीबीआय न्यायालयाने त्याला कारावासासोबतच 29 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षाही ठोठावली.
* भादंविच्या 376, 511, आणि 506 कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
* शिक्षा ठोठावताच सिरसात जाळपोळ, सुरक्षा यंत्रणांकडून कठोर कारवाई
* वृत्तांकन करणार्या मीडियाच्या प्रत्येक ओबी व्हॅनला दिले पोलिस संरक्षण