नायब तहसीलदारांचे आश्वासन : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने दिले निवेदन
भुसावळ- पायाभूत चाचणी असल्याने 30 रोजी सकाळी 11 वाजता होणारी बीएलओ मीटिंगची वेळ बदलण्यासंदर्भात 28 रोजी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ भुसावळ तालुका संघटनेतर्फे महसूल नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पाच ते दहा वर्षांपासून बीएलओ काम करणार्या शिक्षकांच्या ऑर्डर रद्द करा अशी मागणी देखील संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवडणूक नायब तहसीलदार विजय भालेराव यांच्याकडे लावून धरल्याने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
विविध मागण्यांबाबत निवेदन
निवेदनाचा आशय असा की, 30 रोजी बीएलओ मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता 2री ते 8वी च्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा सर्व शिक्षकांना घ्यावयाची आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शाळेवर पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्या कारणाने शिक्षकांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे मीटिंगची वेळ बदलण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत निवडणूक कामाचे मानधन देखील लवकरात लवकर मिळावे, बीएलओ यांना आयकार्ड मिळावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. मीटिंगची वेळ बदलण्यात आली असल्याचे निवडणूक नायब तहसीलदार विजय भालेराव यांनी सांगितले तर अनेक वर्षांपासून बीएलओ काम करणार्या शिक्षकांच्या ऑर्डर रद्द केल्या जातील असे आश्वासन भालेराव यांनी दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, सचिव जीवन महाजन, जिल्हा समिती सदस्य हेमंत धांडे, महादेव सरकटे, पुष्पा दाणी, अतुल सोनुने, रामकृष्ण इतवारे, अमित चौधरी, योगेश बोरसे, सुनीता भारंबे, नबाब तडवी उपस्थित होते.