बारामतीतील धक्कादायक प्रकरण; गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा
बारामती : तालुक्यातील शारदानगर येथे गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहा वर्षीय मुलीचा तिच्या शिक्षकानेच विनयभंग करत, तिच्याशी लैंगिक चाळे केले. सचिन साळुंखे असे या नराधम शिक्षकाचे नाव असून, गुरुवारी शाळेमध्ये ही घटना घडली. शिक्षकाविरोधात तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयित शिक्षकाने लेझीम आणण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला खोलीत नेत, त्याने तिच्याशी लैंगिक चाळे केले. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने शाळेतून घरी गेल्यावर आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसात फिर्याद दिली.
प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव?
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक सचिन साळुंके (रा. बारामती) याने लेझीम खेळण्याच्या तासाला लेझीम आणण्याच्या बहाण्याने 10 वर्षीय विद्यार्थिनीला स्टाफरूममध्ये बोलावून घेतले. यावेळी आरोपी साळुंके याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात विद्यार्थिनीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपअधीक्षक अश्विनी केदार अधिक तपास करीत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक सुरेंद्रसिंह गौंड यांना विचारले असता, त्यांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दिली. राजकीय वरदहस्त लाभलेल्या शिक्षणसंस्थाचालकाकडून या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून पोलिसांवर मोठा दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.