दहा वर्षीय चिमुकल्यासह विवाहितेची तापी पात्रात आत्महत्या
मयत विवाहिता वाडीतील रहिवासी : आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शिरपूर : शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील माहेर व तालुक्यातील वाडी बु.॥ येथील सासर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेने दहा वर्षीय चिमुकल्यासह गिधाडे येथील नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. योगीताबाई रवींद्रसिंग गरासे (30) व मुलगा तेजेंद्र रवींद्रसिंग राजपूत (10, रा.वाडी बु.॥, ता.शिरपूर) मयतांचे नाव आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महिलेचा मृतदेहा हाती लागला मात्र चिमुकल्याचा मृतदेह दुसर्या दिवसापर्यंत मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरूच होते.
माहेरून सासरी जाताना उचलले टोकाचे पाऊल
मयत योगीताबाई राजपूत या महिलेचे शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील माहेर असून ती आपल्या पाचवीत शिक्षण घेणार्या 10 वर्षीय मुलासह माहेरी डोंगरगाव येथे गेली होती व गुरुवार, 16 जून रोजी सासरी वाडी बु.॥ येथे येण्यासाठी निघाली होती मात्र सासरी न जाता गिधाडे येथील तापी नदी पुलावर आल्यानंतर महिलेने मुलासह तापी पात्रात उडी घेतली. घटनास्थळी बॅग, चपला, साडी, वह्या मिळून आल्यानंतर वहिवरील नाव व फोन नंबरवरून महिलेची ओळख पटविण्यात यश आले.