शहादा: तालुक्यातील बामखेडा येथील कोरोणाच्या संसर्ग झालेल्या संबंधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आरोग्य प्रशासनामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली असून दहा व्यक्तींचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी दिली.
बामखेडा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला.त्यानुसार प्रशासनाने लागलीच गावात धाव घेऊन पुढील उपाययोजना केल्या. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बामखेडा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच नजीकचे वडाळी आणि काकर्दे हे गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच गावात चार आरोग्य पथकामार्फत घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये काही त्रास जाणवल्यास आरोग्य प्रशासनाची तात्काळ संपर्क साधावा, प्रशासन उपाययोजना करत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.