भुसावळ/जळगाव : वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर तापी पात्रातून वाळू वाहतूक करू देण्यासाठी व वाहनावर कारवाई न करण्यासाठी दरमहा दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या देवगाव सजा येथील तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने चोपडा तहसील आवारात बुधवारी रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. भूषण विलास पाटील (32, रा.पंकज नगर,चोपडा, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तहसील आवारात स्वीकारली लाच
चोपडा तालुक्यातील मितावली येथील 34 वर्षीय तक्रारदार यांचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर असून त्यावर कारवाई न करण्यासाठी व वाळूची नियमित वाहतूक करू देण्यासाठी दरमहा प्रमाणे दहा हजार रुपयांची लाच तलाठी भूषण पाटील यांनी बुधवार, 16 रोजी मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार दिल्याने सापळा रचण्यात आला. आरोपीने चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.