दहिंदुले शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात मिरवणुकीने स्वागत

0

नंदुरबार। नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात सर्वत्र मोठ्या उत्साहात झाली. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या बालकांचे हर्षौल्हासात स्वागत करण्यात आले.नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील शाळेत नवीन विद्यार्थांचे स्वागत मात्र आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. पहिलीत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येकाला टीळा लावून आणि गुलाबपुष्प देऊन या विद्यार्थांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या दहिंदुले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल होणार्‍या विद्यार्थांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते.हीच परंपरा कायम ठेवत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहभागाने विद्यार्थांचे स्वागत व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम एखाद्या उत्सवाप्रमाणे सजविलेल्या ट्रॅक्टरमधून नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थांना मिरवणूकीने शाळेत आणण्यात आले. शालेय बॅण्डपथकाच्या तालावर थिरकणार्‍या लेझीम पथकातील चिमुरड्या बालकांनी यावेळी लक्ष वेधून घेतले.

मिरवणुकीत पालकांचा सहभाग
मिरवणूकी दरम्यान पालकांनी आपल्या पाल्यांना ट्रक्टरमधून बसवून शालेय शिक्षणासाठी आपले बालक सज्ज असल्याचे दाखवून दिले. दहिंदुले येथील उपसरपंच दीपक मराठे,मुख्याध्यापक बी.के.पाटील, उपमुख्याध्यापक सोनवणे, रोहिदास मोगल,व शाळेच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.दहिंदुले शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र बोरसे, विनोद सैंदाणे,रुपाली पाटील,प्रवीण पवार,जागृती गजरे, योगित वाघ, गंगाराम वळवी, हरीश मराठे, भटू वळवी,नामदेव ठाकरे,संतोष ठाकरे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.