दहिवद ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ; कारवाईची मागणी

0

अमळनेर । तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतचे दप्तर गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर शिस्तभंग करण्याची मागणी गट विकास अधिकारी यांच्या लेखी तक्रार देवून केली आहे. तालुक्यातील दहिवद येथील ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर तेराव्या वित्त आयोग, मासिक सभा, ग्राम सभेचे प्रोसिडिंग बुक कार्यालयात उपलब्ध नाहीत तसेच भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेचे नमुना नं. 5 च्या कश बुकमध्ये सन 2010 पासूनचा जमा खर्च ताळेबंध हा संजीव सैंदाणे यांच्या हस्ते अक्षरात आहे त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती नसतांना त्यांनी त्यात फेरफार केला कसा? त्यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून 2013 नियुक्ती झालेली आहे. त्यावेळी पदभार देतांना त्यांना योजना निहाय सर्व दप्तर देण्यात आलेले आहे, त्याची नोंद पंचायत समितीला आहे. ग्राम पंचायत कार्यालयातील संपुर्ण दप्तराची देखभाल व सांभाळण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे यांची होती. यावरुन ग्राम विकास अधिकारी यांनी दप्तर गहाळ केल्याचे दिसून येते.

दप्तरात गैरव्यवहारही केल्याचा आरोप
गहाळ झालेल्या दप्तराची शासकीय नियमानुसार गट विकास अधिकारी व पोलीस स्थानकात तक्रार होणे क्रमप्राप्त होते. परंतु तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी तक्रार दाखल केलेली नाही, यावरुन दप्तर गहाळ करण्यात त्यांचाच हस्तक्षेप असल्याचे दिसून येते. भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेच्या दप्तर गहाळ करून त्यांच्या कार्यकक्षेत नसतांना मागील व्यवहारात हस्तक्षेप केल्याचे नोंदीवरून दिसून येते. सर्व गैरव्यवहाराला तेच कारणीभूत असून शासकीय दप्तरात फेरफार करणे, शासकीय दप्तर गहाळ करणे या कारणास्तव त्यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी लेखी तक्रार गट विकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.