दहिवेल । सैन्यदलातील जवान, शिक्षकाचे घर रात्री चोरट्यांनी साफ केले. दोन घरफोड्यामध्ये चोरट्यांच्या हाती रोकड आणि दागिने असा हजारोंचा ऐवज लागला आहे. घरफोडीच्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल गावातील विद्यानगर कॉलनीत रहाणारे निवृत्त लष्करी जवान विजय तुकाराम गोखले हे कुडाशी गावात सिक्युरिटी वॉचमनचे काम करतात. ते काल रात्री ड्यूटीवर कुडाशीला गेले होते तर त्यांचा मुलगा व पत्नी बडोदा येथे गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी विजय गोखले यांचे घर साफ केले. गोखले यांची पत्नी आणि मुलगा रात्री 3.30 वाजता घरी परतले. तेव्हा त्यांना गेट व दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. अज्ञात चोरट्यांनी गोदरेज कपाटाचे लॉकरही तोडलेले दिसून आले. त्या कपाटातील 5 तोळे सोन्याचे दागिने आणि 12 हजाराची रोकड लंपास झाल्याचे आढळले. याबाबतची तक्रार विजय गोखले यांनी आज काळी दहिवेल पोलिसात दाखल केली. दुसरी चोरी शिक्षक मुरलीधर आत्माराम सूर्यवंशी यांच्या घरी झाली. त्यांचे कुटुंब देखील गावाला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. तेथून दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दहिवेल औट पोस्टला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.