चाळीसगाव – वनविभागाकडुन परवानगी न घेता लिंबाची ४ डेरेदार झाडे तोडुन त्याची वाहतुक करणारा ट्रक चाळीसगाव वनविभागाने तालुक्यातील दहीवद शिवारातील शेतात दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पकडुन चालक व व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षाची सर्रास कत्तल करुन ती लाकडे चोरट्या मार्गाने मालेगाव, धुळे आदी ठिकाणी जात आहेत यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडुन दुष्काळ पडत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील प्रादेशीक भागात चाळीसगाव प्रादेशिक वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे, वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक अजय महीरे, मंदा मोरे, वनमजुर हे दिनांक ५ रोजी चाळीसगाव कुंझर गावादरम्यान गस्त घालत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास दहीवद गावाजवळ पेट्रोल पंपाजवळ अरुण बाजीराव पाटील यांच्या शेतात लाकडे भरत असलेला ट्रक त्यांना दिसल्यावर पथकाने त्याठिकाणी जावुन पाहणी केली असता शेतातील लिंबाची ४ डेरेदार झाडे तोडण्याची व वाहतुक करण्याची वनविभागाची परवानगी न घेता झाडे कापुन ट्रक क्रमांक (एमएच १८ – ७०८८) मध्ये भरत असल्याने वनविभागाने पंचनामा करुन ईमारती व जळावु असे एकुण ८ घनमीटर लाकुड असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहन चालक मुलकीत खान रा आयशा नगर व व्यापारी मजहर खान महाराष्ट्र काट्याजवळ दोन्ही रा मालेगाव यांच्यावर चाळीसगाव वनविभाग कार्यालयात वनपाल प्रकाश देवरे यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ चे कलम ३ व भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम ४१(२) ब चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास वनरक्षक अजय महीरे करीत आहेत.