दहीहंडीचा फ्लेक्स लावण्याच्या वादावरून तरुणाचा खून

0

पुणे : दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून झालेल्या वादातून पाचजणांनी तलवारीने वार करून एका दुकानदाराची हत्या केल्याची घटना सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे घडली. अक्षय अशोक घडसी (24, रा. माणिकबाग) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल अशोक घडसी यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय आणि चौधरी, दारवटकरासह त्याचे साथीदार एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून नुकताच वाद झाला होता. अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुण पेट्रोल पंपाजवळ पडल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. दहीहंडीचा फ्लेक्स लावण्याच्या वादातून 5 जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.