दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

0

एरंडोल। शहरातील मरिमाता चौक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम गोविंदा पथकाला न देता सर्व रक्कम देशाच्या संरक्षणासाठी प्राणाचे बलिदान देऊन शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी देऊन आदर्श निर्माण केला. मरिमाता मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. भाजपाच्या नगरसेविका छाया दाभाडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. मरिमाता चौकात मंडळाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली.

नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दहीहंडीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अकरा हजार रुपय बक्षिसाच्या रकमेचा धनादेश निवासी नायब तहसीलदार देवराज यांना नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम,गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल गुजर, नगरसेवक नितीन महाजन, योगेश महाजन, माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील, पापा दाभाडे,आनंद दाभाडे, शांताराम चौधरी, राजू चौधरी यांचेसह मंडळाचे पदाधिकारी व गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

रक्कम देण्याचा निर्णय
दहीहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकास बक्षीस देण्यात येते.यावर्षी देखील दहीहंडीचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. आयोजन समितीचे प्रमुख माजी नगरसेवक पापा दाभाडे, अमोल तांबोळी, कैलास महाजन, पिंटू बडगुजर, नाना शिंपी, प्रवीण चौधरी, आनंदा चौधरी, आप्पा चौधरी, नितीन पांचाळ, रवी महाजन, आकाश इंगळे, दीपक पांचाल, नितिन लोहार, भारत लोढे, सोनू शिंपी, प्रवीण महाजन, किरण पांचाळ या मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी दहीहंडीची बक्षिसाची रक्कम गोविंदा पथकाला न देता सदरची रक्कम शहीद जवानांच्या परिवाराला देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.